28 नोव्हेंबर 2026 : मदुराई (तामिळनाडू) : तामिळनाडूमधील मदुराई येथील प्रसिद्ध थिरुपरंकुंद्रम (Thiruparankundram) टेकडीवरील (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम प्रज्वलनाचा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानंतर टेकडीवरील धार्मिक विधी शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान मदुराई येथे दाखल झाले आहेत. CRPF जवानांना थिरुपरंकुंद्रम टेकडीवर सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 28 नोव्हेंबर रोजी टेकडीवरील ऐतिहासिक दीपस्तंभावर (Deepathoon) कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या या धार्मिक विधीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Karthigai Deepam बाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; CRPF कडे सुरक्षा व्यवस्था
शुक्रवारी, 27 नोव्हेंबर 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने 28 नोव्हेंबर रोजी थिरुपरंकुंद्रम टेकडीवरील दीपथून या दगडी स्तंभावर (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने या विधीसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याची जबाबदारी CRPF कडे सोपवली आहे. विशेष म्हणजे, टेकडीवरील मंदिरासोबतच जवळ असलेल्या सिकंदर दरगाहच्या सुरक्षेचीही काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, दीप प्रज्वलनाचे ठिकाण दरगाहपासून सर्व बाजूंनी किमान 50 मीटर अंतरावर असावे. तसेच भाविकांना या धार्मिक विधीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नेमका काय आहे थिरुपरंकुंद्रम (Karthigai Deepam) दीपम वाद?
थिरुपरंकुंद्रम टेकडी ही तामिळनाडूतील मदुराई शहराजवळील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान सुब्रमण्यम स्वामी (मुरुगन) यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. तामिळनाडूतील मदुराई शहराजवळ असलेले थिरुपरंकुंद्रम येथील भगवान सुब्रमण्यम स्वामी (मुरुगन) मंदिर हे दक्षिण भारतातील भगवान मुरुगन यांच्या सहा पवित्र निवासस्थानांपैकी (अरुपडैवीडू) पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच ठिकाणी भगवान मुरुगन यांनी राक्षस सुरपद्मनाचा वध केल्यानंतर देवांचा राजा इंद्र यांची कन्या देवसेना (देवयानी) हिच्याशी विवाह केला. त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे मंदिर प्राचीन पांड्यकालीन स्थापत्यशैलीसाठीही प्रसिद्ध असून, टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या खडकात कोरलेल्या मंदिररचनेमुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम उत्सव हा तामिळनाडूमधील अत्यंत महत्त्वाचा पारंपरिक हिंदू दीपोत्सव आहे. तमिळ महिन्यातील कार्तिगाई पौर्णिमेच्या आसपास हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि भगवान मुरुगन यांच्या श्रद्धेशी संबंधित धार्मिक विधी केले जातात. थिरुपरंकुंद्रम टेकडीवरील ‘दीपथून’ नावाच्या दगडी स्तंभावर पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलित करण्याच्या मागणीमुळे यंदा हा उत्सव विशेष चर्चेत आला आहे. मंदिराशी संबंधित भाविक आणि हिंदू संघटनांच्या मते, या दगडी स्तंभावर दीप प्रज्वलित करणे ही धार्मिक परंपरेचा भाग आहे. मात्र, तेथून जवळपास ५० मीटर अंतरावर असलेल्या हजरत सुलतान सिकंदर बदुशा औलिया यांच्या दरगाहच्या पार्श्वभूमीवर या जागेच्या वापरावरून वाद निर्माण झाला. हा वाद मद्रास उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 28 नोव्हेंबर 2026 रोजी दीपथून येथे दीप प्रज्वलित करण्याचा विषय राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
कोण आहेत ? हजरत सुलतान सिकंदर बदुशा औलिया :
तामिळनाडूतील मदुराई शहराजवळील थिरुपरंकुंद्रम टेकडीवर हजरत सुलतान सिकंदर बदुशा औलिया (Hazrat Sultan Sikandar Badhusha Auliya) यांची प्रसिद्ध दरगाह आहे. ऐतिहासिक नोंदी आणि स्थानिक धार्मिक परंपरांनुसार, सुलतान सय्यद सिकंदर बदुशा हे 12व्या शतकातील सूफी संत होते. ते मदिनेतून सय्यद इब्राहिम शहीद यांच्यासोबत इस्लामच्या प्रचारासाठी भारतात आल्याची परंपरा सांगितली जाते. मदुराई परिसरात त्यांचा प्रभाव निर्माण झाला आणि स्थानिक संघर्षात थिरुपरंकुंद्रम टेकडीवर त्यांना वीरमरण आले, अशी धार्मिक आख्यायिका आहे. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ येथे समाधी उभारण्यात आली आणि पुढील काळात तिचे दरगाह व मशिदीत रूपांतर झाले. या दरगाहला देशभरातील मुस्लिम भाविक भेट देतात. दरवर्षी इस्लामी हिजरी दिनदर्शिकेतील रजब महिन्यात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘संदल कूडू’ (Urs) उत्सव साजरा केला जातो. या दरगाहच्या इतिहासाबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे 12व्या शतकातील सय्यद सिकंदर बदुशा आणि 14व्या शतकातील मदुराई सल्तनतीचा शेवटचा शासक अलाउद्दीन सिकंदर शाह हे दोन वेगवेगळे व्यक्ती असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाच्या 2025 मधील नोंदीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या संतांचा इतिहास आणि त्यांच्याशी संबंधित धार्मिक परंपरा समजून घेताना या दोघांमधील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
अशाप्रकारे तामिळनाडूतील मदुराई शहराजवळ असलेल्या थिरुपरंकुंद्रम टेकडीला हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या दृष्टीने ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. या टेकडीच्या पायथ्याशी भगवान मुरुगन यांचे प्रसिद्ध सुब्रमण्य स्वामी मंदिर असून, टेकडीच्या शिखरावर सूफी संत हजरत सुलतान सिकंदर बदुशा औलिया यांची दरगाह आहे. स्थानिक धार्मिक परंपरेनुसार, हजरत सिकंदर बदुशा औलिया हे मदिनेतून भारतात आलेले सूफी संत होते. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दरगाह विकसित झाली आणि आजही अनेक मुस्लिम भाविक येथे दर्शनासाठी येतात. दुसरीकडे, हिंदू भाविकांसाठी ही टेकडी भगवान मुरुगन यांचे पवित्र स्थान आहे. याच टेकडीवरील दरगाहपासून सुमारे 50 मीटर अंतरावर असलेल्या ‘दीपथून’ नावाच्या दगडी स्तंभावर (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्याच्या मागणीमुळे वाद निर्माण झाला. हिंदू संघटनांच्या मते, या स्तंभावर दीप प्रज्वलित करण्याची परंपरा पुनर्स्थापित व्हावी; तर दरगाहशी संबंधित पक्षाने टेकडीच्या शिखरावरील जागेच्या मालकीसंदर्भात आक्षेप घेतला आहे. या वादात नंतर मंदिर प्रशासन, दरगाह व्यवस्थापन, तामिळनाडू सरकार आणि न्यायालये सहभागी झाली आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका दिव्याच्या प्रज्वलनापुरता मर्यादित न राहता ऐतिहासिक मालकी हक्क, धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि कायदा-सुव्यवस्था यांच्याशी जोडला गेला आहे.
20 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिली होती परवानगी
या प्रकरणात 20 नोव्हेंबर 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला होता. न्यायालयाने 24 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम उत्सवासाठी दीपथून येथे दीप प्रज्वलित करण्यास एकदाच विशेष परवानगी दिली होती. या आदेशातील महत्त्वाच्या बाबी अशा होत्या :
- 24 नोव्हेंबर रोजी दीपथून येथे दीप प्रज्वलित करण्याची परवानगी.
- मंदिर प्रशासनाचे अधिकृत प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांच्या माध्यमातून विधी पार पाडण्याची व्यवस्था.
- आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश.
- या परवानगीमुळे भविष्यात कोणालाही त्या जागेवर कायमस्वरूपी हक्क किंवा ताबा मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
- हा आदेश केवळ 2026 मधील उत्सवापुरता मर्यादित होता.
मात्र, 24 नोव्हेंबर रोजी दीपथून येथे दीप प्रज्वलित झाला नाही. त्याऐवजी मंदिराच्या पारंपरिक ठिकाणी म्हणजे उची पिल्लैयार मंदिराजवळील दीपमंडपात दीप प्रज्वलित करण्यात आला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
27 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका
24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. न्यायालयाने तामिळनाडू प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या मते, यापूर्वी दिलेल्या आदेशाचे प्रथमदर्शनी जाणीवपूर्वक आणि उघडपणे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. न्यायालयाने पुढील महत्त्वाचे आदेश दिले :
- 28 नोव्हेंबरला दीप प्रज्वलन: दीपथून येथे (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले.
- CRPF ची तैनाती: मंदिर आणि दरगाह या दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षेसाठी CRPF ला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
- मंदिर विश्वस्त मंडळ निलंबित: अरुलमिगु सुब्रमणिय स्वामी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार स्थगित केले.
- दोन माजी न्यायाधीशांची नियुक्ती: मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि व्ही. पार्थिबन यांची मंदिर प्रशासनाची जबाबदारी पाहण्यासाठी नियुक्ती केली.
- अवमान नोटीस: तामिळनाडूचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (DGP), मदुराई जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी नोटीस बजावली.
तसेच, अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ई-मेल, फोन कॉल्स आणि संदेशांची माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.
मंदिर आणि दरगाह दोन्हींच्या सुरक्षेची जबाबदारी
या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेला विशेष महत्त्व दिले आहे. दीप प्रज्वलनाच्या ठिकाणापासून सिकंदर दरगाह सर्व बाजूंनी किमान 50 मीटर अंतरावर असावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच दरगाह परिसराचे संरक्षण करण्यासाठीही आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे CRPF जवानांची तैनाती ही केवळ दीप प्रज्वलनापुरती मर्यादित नसून, टेकडीवरील दोन्ही धार्मिक स्थळांची सुरक्षा आणि संभाव्य तणाव टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
आजच्या दीप प्रज्वलन विधीकडे देशाचे लक्ष
28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दीप प्रज्वलनासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी उची पिल्लैयार मंडपात प्रज्वलित केलेली ज्योत अद्याप सुरू असल्यास तिचाच वापर करावा किंवा अन्य योग्य व्यवस्था करून दीप प्रज्वलित करावा, असे न्यायालयाने सांगितले आहे. या आदेशामुळे चार दिवसांनंतर पुन्हा एकदा (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम विधी पार पडणार आहे.दरम्यान, CRPF जवान मदुराईत दाखल झाल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. धार्मिक भावना, न्यायालयीन आदेश आणि सार्वजनिक शांतता या तिन्ही बाबींचा समतोल राखत हा विधी पार पडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
