नवी दिल्ली / मॉस्को – भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी मॉस्को येथे ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) केला. या करारानुसार SJ-100 या प्रादेशिक प्रवासी विमानाचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. एच.ए. एल. ला देशातील एकमेव अधिकृत भागीदार म्हणून या विमानाच्या असेंब्ली आणि निर्मितीचे अधिकार देण्यात आले आहेत. हा करार “उडान” योजनेअंतर्गत देशातील टियर-2 आणि टियर-3 शहरांना हवाईसेवेद्वारे जोडण्यासाठी मोठी चाल मानली जात आहे. द्वि-इंजिन असलेले हे विमान 75 ते 100 प्रवाशांची आसन क्षमता आणि 4,500 किलोमीटर उड्डाण श्रेणी असेल. या विमानात रशियानेच विकसित केलेले स्वदेशी PD-8 इंजिन बसवले जाईल. या उपक्रमामुळे भारतात अनेक दशके थांबलेली नागरी प्रवासी विमान निर्मिती पुन्हा सुरू होणार आहे. हे “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या दोन्ही उपक्रमांना चालना देणारे पाऊल ठरणार आहे. तांत्रिक हस्तांतरण, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठीही हा करार निर्णायक ठरेल.

HAL – UAC करारावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कराराबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे:
“HAL आणि सार्वजनिक संयुक्त स्टॉक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (PJSC-UAC) यांच्यात भारतात SJ-100 नागरी प्रवासी विमान निर्मितीसाठी झालेला हा करार भारतीय नागरी विमानवाहतुकीसाठी ऐतिहासिक टप्पा आहे. SJ-100 हे ‘उडान’ योजनेसाठी गेम चेंजर ठरेल आणि नागरी विमान क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल उचलले जाईल.”
ते पुढे म्हणाले की, “SJ-100 हे AVRO युगानंतर भारतात पूर्णपणे तयार होणारे पहिले प्रवासी विमान ठरेल. यामुळे खासगी क्षेत्रालाही बळकटी मिळेल व विमान उद्योगात हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.”
HAL आणि UAC करारावर स्वाक्षरी
HAL आणि UAC यांच्या वतीने श्री. प्रभात रंजन (HAL) आणि श्री. ओलेग बोगोमोलोव (UAC) यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या वेळी HAL चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील तसेच UAC चे डायरेक्टर जनरल वादीम बाडेखा उपस्थित होते.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही भारत सरकारच्या मालकीची एक अग्रगण्य एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे, जी लष्करी व नागरी विमानांच्या डिझाइन, उत्पादन आणि देखभालीत महत्त्वाची भूमिका बजावते. 1940 साली स्थापन झालेली ही कंपनी सध्या बेंगळुरू येथे मुख्यालयासह देशभरात विविध उत्पादन केंद्रे चालवते. रशियाची युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) ही एक प्रमुख एरोस्पेस होल्डिंग कंपनी असून ती रशियातील प्रवासी व लष्करी विमानांच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनासाठी ओळखली जाते. दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट म्हणजे एकत्रितपणे प्रगत विमान तंत्रज्ञान विकसित करून जागतिक विमान उद्योगात दीर्घकालीन सहकार्य प्रस्थापित करणे.
HAL च्या अधिकृत निवेदनानुसार, “हा करार भारतातील नागरी विमान उद्योगासाठी नवी दिशा देणारा ठरेल. HAL आणि UAC मिळून SJ-100 च्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेचे आराखडे आणि तांत्रिक हस्तांतरणाचे टप्पे निश्चित करतील.”
करारात भारतासाठी संभाव्य लाभ
भारतासाठी या करारातून मिळणारे संभाव्य लाभ अत्यंत व्यापक आणि दीर्घकालीन असतील जसे कि –
- प्रादेशिक विमान सेवेत आत्मनिर्भरता वाढेल.
- देशांतर्गत उत्पादनामुळे आयात खर्च कमी होईल.
- तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे भारतीय अभियंत्यांना कौशल्य वृद्धीची संधी मिळेल.
- HAL च्या उत्पादन केंद्रांमध्ये थेट रोजगार निर्मिती होईल.
- नागरी व लष्करी विमान निर्मिती दरम्यान नमुना एकात्मता वाढेल.
एच.ए. एल. आणि रशियाच्या यु.ए.सी. यांच्यात झालेल्या SJ-100 विमान निर्मितीच्या करारामुळे भारताच्या प्रादेशिक विमान सेवेत आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय सुरू होईल. देशातील टियर-2 आणि टियर-3 शहरांना जोडणाऱ्या “उडान” योजनेखाली स्वदेशी पातळीवर तयार होणारी ही विमाने वापरल्याने परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि आयात खर्चात मोठी बचत होईल.
या प्रकल्पांतर्गत रशियन तंत्रज्ञानाचे भारतात हस्तांतरण होणार असल्याने भारतीय अभियंते, तंत्रज्ञ आणि विमान डिझाइन क्षेत्रातील तज्ञांना नवे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल. यामुळे भारतातील एरोस्पेस उद्योगात तांत्रिक क्षमता आणखी मजबूत होईल. याशिवाय, HAL च्या उत्पादन केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात थेट रोजगार निर्मिती तर होईलच, पण त्यासोबत अप्रत्यक्षपणे पुरवठा साखळीत असलेल्या लाखो कुशल व अकुशल कामगारांनाही काम मिळेल.
नागरी आणि लष्करी विमान निर्मिती दरम्यान तांत्रिक अनुभव व उत्पादन नमुने सामायिक केल्याने दोन्ही क्षेत्रांमध्ये समन्वय वाढेल. या एकात्मतेमुळे भारतात विमान निर्मितीचा खर्च कमी होईल, कार्यक्षमता वाढेल आणि जागतिक बाजारात भारतीय विमान उद्योगाला स्पर्धात्मक स्थान मिळेल. एकंदरीत, हा उपक्रम भारताला नागरी विमान निर्मिती क्षेत्रात जागतिक नकाशावर अग्रस्थानी नेणारा निर्णायक टप्पा ठरेल.
या करारामुळे भारतात नागरी विमान निर्मिती क्षेत्राचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, HAL आणि UAC यांच्यातील ही भागीदारी भारताला पुढील दशकात स्वतःच्या ब्रँडचे प्रवासी विमान निर्यात करणारा देश बनवू शकते.
उडान (UDAN) योजना काय आहे?
उडान (UDAN) योजना ही भारत सरकारची प्रादेशिक हवाई संपर्क वाढविण्यासाठीची एक महत्त्वाकांक्षी पहल आहे. 2017 साली सुरू करण्यात आलेली ही योजना “उडे देश का आम नागरिक” या संकल्पनेवर आधारित आहे, ज्याचा उद्देश म्हणजे देशातील सामान्य नागरिकालाही परवडणाऱ्या दरात हवाई प्रवासाची संधी उपलब्ध करून देणे. उडान योजनेअंतर्गत लहान शहरांमधील विमानतळांना पुन्हा सक्रिय करण्यात आले असून, मोठ्या शहरांशी त्यांचा थेट हवाई दुवा निर्माण केला जात आहे. या माध्यमातून टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील आर्थिक, सामाजिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होत आहेत. तसेच या प्रकल्पामुळे विमान कंपन्यांना अनुदानाच्या स्वरूपात प्रोत्साहन मिळत आहे, ज्यामुळे त्या कमी प्रवास भाड्यात फ्लाईट सेवा देऊ शकतात. उडान योजनेमुळे ग्रामीण व प्रादेशिक भागांमध्ये पर्यटन, रोजगार आणि उद्योगविकासासाठी नवे द्वार खुले झाले आहे, ज्यामुळे देशभरात संतुलित विकास साध्य करण्यास ही योजना मोठी मदत करत आहे.
HAL Share Price
HAL चे रशियन UAC सोबत झालेले SJ-100 प्रवासी विमान निर्मितीचे ऐतिहासिक सामंजस्य कराराचे शेअर बाजारात मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण कराराच्या पार्श्वभूमीवर HALच्या शेअरमध्ये अल्पकालीन चढ-उतार दिसून आले असले तरी, गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे. 28 ऑक्टोबर 2025 रोजी HAL चे शेअर 4,766.60 रुपयांच्या दराने खुले झाले, दिवसभरात उच्चांक 4,767.60 रुपये तर नीचांक 4,706.30 रुपये इतका राहिला आणि दिवसाचा बंद भाव 4,724.50 रुपये होता. या वाढत्या खरेदीमध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूमही जवळपास 9.5 लाख शेअरपर्यंत पोहोचले. बाजार विश्लेषकांच्या मते, HALला भारतात प्रादेशिक जेटचे उत्पादन-असेंब्लीचे विशेष हक्क मिळाल्याने, कंपनीच्या दीर्घकालीन वृद्धीसाठी हे करार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. उदयोन्मुख नागरी विमान निर्मिती व तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे HALच्या शेअरमध्ये भविष्याचा सकारात्मक कल दिसू शकतो
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची समाज माध्यम साईट “X” वरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
पाकिस्तान-सौदी अरेबिया समोरील (India)भारत-यूएईचा(UAE) सामरिक डाव
