Ind vs Ireland- १० जानेवारी रोजी राजकोट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भरतीय महिला संघाने आयर्लंड महिला संघावर सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. २३९ धावांचे लक्ष्य भारताने केवळ ३४.३ षटकांत पार केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Ind vs Ireland- नाणेफेक
आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पॉवरप्लेमध्येच दोन गडी गमावल्याने त्यांचा डाव अडचणीत आला. तितास साधूने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये सारा फोर्ब्सला पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद केले, तर जेेमिमा रॉड्रिग्जने एक उत्तम थ्रो करत उना रेमंड-होएला धावबाद केले. यानंतर प्रिया मिश्रा हिने सलग दोन चेंडूंवर ऑर्ला प्रेंडरगास्टला यष्टिचित करून आणि लॉरा डिलानीला क्लीन बोल्ड करून आयर्लंडला ५६/४ अशा स्थितीत ढकलले.
गॅबी लुईस आणि लिया पॉलने पाचव्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करत आयर्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पॉलला दोन वेळा झेल सोडल्यामुळे भारताला तोटा झाला, पण या जोडीने सावध फलंदाजीसोबतच आक्रमकतेचा योग्य मेळ साधला. अखेर ७३ चेंडूत ५९ धावा करणाऱ्या पॉलला हरलीन देओलच्या अचूक थ्रोने धावबाद केले.
आयर्लंडच्या कर्णधार गॅबी लुईसने ७५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि आपल्या १२९ चेंडूंच्या खेळीत १५ चौकार मारले. ती शतकाच्या जवळ असताना दीप्ती शर्माने तिचा झेल टिपला. डावाच्या शेवटी आर्लीन केलीने वेगवान २८ धावा जोडत संघाला २३८/७ अशा लढाऊ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताच्या पदार्पणवीर सायली साठघरेने १० षटकांत ४३ धावांमध्ये एक बळी घेतला.

Ind vs Ireland- भारताचा डाव
भारताच्या डावाची सुरुवात तडाखेबाज झाली. स्मृती मंधानाने २९ चेंडूत ४१ धावा करत सहा चौकार आणि एका षटकारासह आक्रमक सुरुवात केली. ती पॉवरप्लेमधील शेवटच्या चेंडूवर बाद झाली, पण तिची सलामी जोडीदार प्रतीका रावलने डाव सावरला. रावलने ७० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ८९ धावांची संयमी खेळी केली आणि विजयाच्या अगदी जवळपर्यंत खेळत राहिली.
रावलने क्रीजवर असताना हरलीन देओल आणि जेेमिमा रॉड्रिग्ज कमी धावा करून बाद झाल्या, पण त्यानंतर आलेल्या तेजल हसाबणीसने नाबाद ५३ धावांची चमकदार खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. ऐमी माग्वायरने तीन बळी घेतले, पण कमी धावसंख्येचा बचाव करण्यात आयर्लंड अपयशी ठरला.
Ind vs Ireland- स्कोरबोर्ड
संक्षिप्त धावसंख्या:
आयर्लंड: २३८/७ (गॅबी लुईस ९२; प्रिया मिश्रा २-५६)
भारत: २४१/४ ३४.३ षटकांत (प्रतीका रावल ८९, तेजल हसाबणीस ५३*; ऐमी माग्वायर ३-५७)
भारत विजय: ६ गडी राखून.
आमचे खेळ विषयक अन्य ब्लॉग साठी येथे क्लिक करा.
भारतीय महिला संघाच्या विजयाबद्दलच्या सोशल साईट “x” वरील प्रतिक्रिया.
