देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्राने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज भारताचा आतापर्यंतचा सर्वात जड संप्रेषण उपग्रह CMS-03 यशस्वीरित्या अंतराळात पाठवला. हा उपग्रह LVM3M5 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आला आहे. या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. सामाजिक माध्यमावर त्यांनी लिहिले, “आपले अवकाश क्षेत्र आम्हाला सतत अभिमान देत आहे! भारताच्या सर्वात जड संप्रेषण उपग्रह सी. एम.एस.-03 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे हार्दिक अभिनंदन. आपल्या वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे की भारताचे अवकाश क्षेत्र उत्कृष्टतेचे आणि नवकल्पनांचे प्रतीक बनले आहे. त्यांच्या यशामुळे राष्ट्रीय प्रगतीला चालना मिळाली आहे आणि असंख्य जीवनांना सशक्त बनवले आहे.” इस्रोने देखील या प्रक्षेपणाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर करत लिहिले, “काय क्षण आहे हा! LVM3M5 ने सी. एम.एस.-03 सोबत उड्डाण घेतले, भारताच्या अवकाश प्रवासातील आणखी एका ऐतिहासिक टप्प्याची नोंद झाली.”

ISRO चा CMS-03 उपग्रह
CMS-03 उपग्रह भारतातील विविध प्रदेशांमधील संप्रेषण सेवांना आणखी मजबुती प्रदान करणार असून, डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सी. एम.एस.-03 हा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने नौदलासाठी खास विकसित केलेला सर्वात प्रगत आणि वजनदार संप्रेषण उपग्रह आहे, ज्याचे वजन सुमारे ४,४१०-४,४४० किलो आहे. LVM3-M5 या मिशनद्वारे सी. एम.एस.-03 ला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (GTO) प्रक्षेपित करण्यात आले असून, पुढे तो जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये स्थानापन्न होऊन सात वर्षांपर्यंत सक्रिय राहील. हा उपग्रह भारतीय नौदलाच्या नेटवर्क-केंद्रित युद्धक्षमता, सागरी देखरेख, संवाद तसेच गुप्तचर माहितीच्या जलद देवाणघेवाणीत क्रांतिकारी बदल घडवणार आहे. सी. एम.एस.-03 अनेक फ्रिक्वेन्सी बँड वापरतो ज्यामुळे तो आवाज, व्हिडिओ आणि डेटा एकाच वेळी अत्यंत भरोसेमंदपणे प्रसारित करू शकतो. यामुळे भारताच्या किनारपट्टीपासून सुमारे २,००० किमी पर्यंत संपूर्ण हिंद महासागर परिसरातील नौदल जहाजे, विमाने, पाणबुड्या आणि पृथ्वीवरील कमांड सेंटर्स यांच्यात अखंड संवाद साधता येतो. संस्थेच्या BLOS (Beyond Line Of Sight) क्षमतेमुळे उपग्रह हे जमीनीच्या वक्रतेमुळे अथवा भौगोलिक अडथळ्यांमुळे संवादात कोणताही व्यत्यय आणत नाही.
सी. एम.एस.-03 मध्ये ५० हून अधिक नौदल प्लॅटफॉर्म्सना एकावेळी जोडण्याची क्षमता आहे. सर्वाधिक संवेदनशील सागरी तसेच जमीनीवरील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हवामान निरीक्षण, नेव्हिगेशन, सुरक्षित डेटा ट्रान्समिशन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा सुविधांसाठी हा उपग्रह वापरण्यात येईल. हा उपग्रह भारताच्या सागरी सुरक्षेला आणि डिजिटल क्रांतीला चालना देणार आहे, तसेच देशाच्या सामर्थ्यास महत्त्वपूर्ण बळ मिळवून देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समाज माध्यम साईट “X” वरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
