पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयांवरील मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील नाशिक–सोलापूर–अक्कलकोट (Akkalkot) या सहा-लेन प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या (कॉरिडॉर) बांधकामास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बीओटी (टोल) पद्धतीवर राबविण्यात येणार असून, या महामार्गाची एकूण लांबी ३७४ किलोमीटर तर एकूण भांडवली खर्च ₹१९,१४२ कोटी इतका आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे नाशिक (Nashik), अहिल्यानगर(Ahilyanagar), धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर (Solapur) या जिल्ह्यांना थेट जोडणी मिळणार असून, राज्यातील औद्योगिक आणि व्यापारी वाहतुकीला नवीन गती मिळणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठे पाऊल ठरणार आहे.

नाशिक (Nashik) ते अक्कलकोट (Akkalkot) महामार्गाची राष्ट्रीय महामार्गांशी थेट अखंड जोडणी
नाशिक ते अक्कलकोट या मार्गाने प्रस्तावित ग्रीनफिल्ड कॉरिडॉरची जोडणी दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेवरील वधावन पोर्ट इंटरचेंजजवळ, अग्रा–मुंबई महामार्गावरील नाशिक (अदेगाव) येथील एनएच-६० शी आणि समृद्धी महामार्गाशी पांगरी (नाशिकजवळ) येथे होणार आहे. या महामार्गामुळे पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत अखंड जोडणी मिळेल.
दक्षिणेकडील बाजूस, चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमेजवळ) असा ७०० किमी लांबीचा ४-लेन कॉरिडॉर आधीच उभारला जात आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे देशातील प्रमुख बंदरांना आणि औद्योगिक पट्ट्यांना थेट आधुनिक जोडणी मिळेल.
नाशिक (Nashik) ते अक्कलकोट (Akkalkot) महामार्ग १७ तासांनी प्रवासाचा वेळ कमी करणार
हा सहा-लेन महामार्ग सुमारे १७ तासांनी प्रवासाचा वेळ कमी करणार असून, एकूण प्रवास अंतरातही २०१ किमीची घट होणार आहे. या मार्गावर सरासरी वाहन वेग ६० किमी/तास तर रचना गती १०० किमी/तास एवढी असेल. परिणामी, प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी हा मार्ग अधिक सुरक्षित, जलद आणि अखंड असेल.
नाशिक –अक्कलकोट जोडणीमुळे नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NICDC) च्या कोप्पर्थी आणि ओरवकल नोड्ससाठी मालवाहतुकीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. तसेच, पुणे–नाशिक एक्सप्रेसवेच्या नव्या आराखड्यातील भागालाही या प्रकल्पातून चालना मिळेल.
रोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक विकास
या महामार्ग प्रकल्पातून अंदाजे २५१.०६ लाख मान-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि ३१३.८३ लाख मान-दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील आर्थिक क्रियाकलापांमध्ये वाढ होऊन लघु उद्योजक, वाहतूकदार आणि सेवाक्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल आणि नाशिक–अहिल्यानगर–धाराशिव–सोलापूर या जिल्ह्यांचा आर्थिक व औद्योगिक चेहरामोहरा बदलणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
