भारतीय क्रिकेटपटू (Yuzvendra Chahal) युजवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चहल आणि धनश्री यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव असल्याच्या अफवा पसरत चालल्या आहेत.
या अफवांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे चहलने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून धनश्रीसोबतचे सर्व फोटो काढून टाकले, ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले. मात्र, धनश्रीने अजूनही चहलचे फोटो आपल्या सोशल मीडियावर ठेवले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ देखील निर्माण झाला आहे. शनिवारी रात्री चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक गूढ पोस्ट शेअर केली, ज्यामुळे चर्चेला पुन्हा उधाण आले.

चहलच्या पोस्टमध्ये थेट धनश्रीशी संबंधित काहीही नव्हते, पण पोस्टमधील शब्दांमधून तणाव जाणवतो. त्याने लिहिले, “कष्ट एखाद्या व्यक्तीचा स्वभाव स्पष्ट करतात. तुला तुझा प्रवास, तुझं दुःख आणि तुला इथवर पोहोचण्यासाठी केलेल्या मेहनतीची जाणीव आहे. जगालाही हे माहित आहे. ताठ मानेने उभा रहा आणि तुझे आई-वडील तुझ्यावर अभिमान करतील.”
या पोस्टने अनेक चाहत्यांना चहलच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले. शनिवारी, दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने या चर्चांना आणखी जोर आला. काही अहवालांनुसार, दोघांमध्ये “अपरिवर्तनीय मतभेद” आहेत आणि घटस्फोट अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
चहल आणि धनश्री यांचा साखरपुडा ८ ऑगस्ट २०२० रोजी झाला होता. धनश्री या प्रसिद्ध यूट्यूबर, नृत्यदिग्दर्शिका आणि दंतवैद्य असून त्यांनी झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. या जोडप्याने २२ डिसेंबर २०२० रोजी गुरुग्राममध्ये खाजगी समारंभात लग्न केले.
धनश्रीने याआधी चहलच्या राष्ट्रीय संघातील निवडीसंदर्भात काही समर्थक पोस्ट्स केल्या होत्या. मात्र अलीकडे, दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो करून विभक्त होण्याची शक्यता दर्शवली आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. मात्र, त्यांच्या प्रेमकथेचा शेवट दुःखद वाटतो आहे.
