महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे (Lahuji Salve) यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “थोर आद्य क्रांतिकारक, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!”.लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर येथे झाला होता. ते मांग समाजातील होते आणि त्यांच्या वडिलांकडून त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण मिळाले. त्यांच्या कुशलतेमुळे त्यांना ‘वस्ताद’ ही उपाधी मिळाली.लहुजी वस्ताद साळवे यांनी जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला आणि दलित समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वाहिले.लहुजी वस्ताद साळवे यांनी पुण्यात तालीम केंद्रे स्थापन करून स्वातंत्र्य सेनान्यांना शस्त्रास्त्र आणि युद्धकला शिकवली. त्यांनी धांगड, रामोशी आणि इतर उपेक्षित समाजाला एकत्र करून स्वातंत्र्याची ज्योत रुजवली. त्यांच्या प्रशिक्षणाच्या कार्याने भारताच्या १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
- शिवकालीन वारसा आणि पराक्रम- Lahuji Salve
- क्रांतिकारकांचे गुरू- Lahuji Salve
- बाळ गंगाधर टिळक आणि लहुजींची व्यायाम शाळा (Lahuji Salve)
- (Lahuji Salve) लहुजींचे शिष्य आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
- (Lahuji Salve) लहुजींचे शिष्य महात्मा फुले
- सावित्रीबाई फुलेंसाठी पिता समान लहूजी वस्ताद साळवे
- मुक्ता साळवे: दलित साहित्याची आद्य लेखिका
- अंतिम काळ आणि प्रेरणादायी वारसा
- निष्कर्ष

क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (Lahuji Salve) — १४ नोव्हेंबर १७९४ रोजी, पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावात, एका साधारण हिंदू मांग कुटुंबात एक थोर महापुरुष जन्माला आला, ज्याचे नाव होते क्रांतीगुरू लहूजी राघोजी साळवे. त्यांचे वडील श्री राघोजी साळवे आणि आई विठूबाई साळवे यांचे कुटुंब, स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या योद्ध्यांचे प्रतिनिधित्व करणारे होते. लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण घरातूनच लाभले, कारण त्यांचे वडील शिवकालीन शूर योद्धा होते.
(Lahuji Salve) लहूजी साळवे यांचे व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ‘लहुजी वस्ताद’ या नावाने ओळखले जात असे. ते भारतीय इतिहासाला कलाटणी देणारे प्रखर नेते होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या क्रांतीचे बीज रोवणारे बाळ गंगाधर टिळक यांचे गुरु म्हणून लहूजींचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे, सशस्त्र क्रांतीचे पहिले वीर वासुदेव बळवंत फडके यांना तालीम देणारे क्रांतीगुरू लहूजी साळवे हेच होते. महात्मा ज्योतिराव फुले यांना सामाजिक क्रांतीची प्रेरणा आणि तालीम देण्याचे महत्वपूर्ण कार्यही त्यांनीच केले.
भारतीय इतिहासाच्या दिशा बदलण्याचे महान कार्य क्रांतीगुरू लहूजी साळवे यांनी केले, आणि त्यांच्या नेतृत्वात अनेक क्रांतिकारकांनी स्वतंत्रतेच्या लढ्याला बळ दिले.

शिवकालीन वारसा आणि पराक्रम- Lahuji Salve
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींच्या पूर्वजांची उल्लेखनीय कामगिरी होती. राघोजी साळवे हे पेशव्यांच्या शिकारखाण्याचे प्रमुख होते आणि त्यांचे पूर्वज पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. राघोजी साळवे यांनी आपल्या पित्याकडून पराक्रमाचा वारसा घेतला होता आणि त्यांनी पेशव्यांच्या सैन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या कुटुंबाने पार पाडली होती. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना “राऊत” ही मानाची पदवी दिली होती.
क्रांतिकारकांचे गुरू- Lahuji Salve
लहुजी साळवे हे दांडपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी आणि बंदूक चालवणे अशा अनेक युद्धकौशल्यांमध्ये पारंगत होते. पिता पुत्र ब्रिटिशाविरुद्ध एका युद्धात लढत असताना लहुजी साळवे यांनी आपल्या उघड्या डोळ्याने इंग्रजांच्या हातून आपल्या पित्याची हत्त्या होताना पहिली. या घटनेचा त्यांच्या अंतरात्म्यापर्यंत खोलवर परिणाम झाला त्यांनी आजन्म अविवाहित राहण्याचा व ब्रिटिशांना देशातून बाहेर काढण्याचा निश्चय केला. त्याकरिता त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जहाल क्रांतिकारक घडवण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. इ.स. १८२२ मध्ये त्यांनी पुण्याच्या रास्ता पेठेत तालीम केंद्र स्थापन केले, जिथे सर्व जाती आणि समाजातील युवकांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाई. या तालीम केंद्रात बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी शिक्षण घेतले. ज्या क्रांतिकारकांनी त्यांनतर भारतीय स्वातंत्र्य युद्धात आणि सामाजिक परिवर्तनात मोलाची भूमिका निभावली.

बाळ गंगाधर टिळक आणि लहुजींची व्यायाम शाळा (Lahuji Salve)
भारतीय राजकारणाला नवी दिशा देणारे आणि भारतीय स्वातंत्र्यता युद्धात सर्वात महत्वाची भूमिका मांडणारे प्रमुख नेता म्हणजे बाळ गंगाधर टिळक होय. लोकमान्य टिळक हे लहूजी वस्ताद साळवे यांचे शिष्य होते त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात ते लहुजींच्या व्यायामशाळेत जात असत. तेथेच त्यांना ब्रिटीश राजवटी विरूद्धचे विचार, इंग्रजांना भारताबाहेर काढण्यासाठी सशत्र क्रांतीचे महत्व लहूजीद्वारे त्यांच्या मनात पेरले गेले. त्यामुळेच आपण म्हणू शकतो कि , टिळकांच्या अंगी असलेल्या जहालमतवाद हा लहूजी वस्ताद साळवे यांच्या तालमीतून त्यांना मिळालेला होता. तसेच (Lahuji Salve) लहुजींच्या तालमीतच टिळक शारीरिकरित्या मजबूत होत गेले.
(Lahuji Salve) लहुजींचे शिष्य आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे, दांड पट्टा चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले. त्यापैकी वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र क्रांतीची सुरुवात केली. शस्त्र उचलल्याशिवाय इंग्रजांना भारताबाहेर काढता येणार नाही या लहुजींच्या शिकवणीतून. वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकारक तरुणांना एकत्र घेतले व इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. त्यांची प्रेरणा घेत पुढे अनेक तरुण क्रांतिकारकांनी भारतमातेसाठी आपले प्राण त्यागले.
(Lahuji Salve) लहुजींचे शिष्य महात्मा फुले
लहुजींनी रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध व कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यावर या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. लहुजी साळवे यांचे कुस्ती आखाडे केवळ शारीरिक प्रशिक्षणाचे केंद्र नव्हते, तर ते राष्ट्रप्रेम, समाजिक न्याय, आणि स्वातंत्र्याच्या विचारांचे केंद्र होते. त्यांच्या आखाड्यातूनच अनेक क्रांतिकारक तयार झाले. त्यांनी लोकांमध्ये एकता निर्माण केली आणि जातीभेद, वर्णभेदाच्या विरोधात समाजाला एकत्र केले. याच आखाड्यात तयार झालेले आणखी एक थोर समाजसेवक म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले होय.लहुजी साळवे हे केवळ योद्धाच नव्हते, तर समाजसुधारक देखील होते. त्यांनी आपल्या आखाड्यातील मुलांना जात-पात आणि विषमतेच्या विरोधात लढायला शिकवले. महात्मा फुले यांना सामाजिक विषमतेच्या समस्येबद्दल जागृत करणारे लहुजीच होते. लहुजींच्या प्रेरणेनेच महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लहुजींनी (Lahuji Salve) अस्पृश्य समाजातील लोकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली.
सावित्रीबाई फुलेंसाठी पिता समान लहूजी वस्ताद साळवे
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात जेव्हा पहिली मुलींची शाळा सुरु केली तेव्हा समाजकंटक त्यांना त्रास देऊ लागले, त्यांच्या अंगावर शेण फेकणे, दगड गोटे फेकणे, इत्यादी घटना घडू लागल्या तेव्हा लहूजी वस्ताद साळवे यांनी आपले शिष्य राणोजी आणि त्यांचे इतर सहकारी यांना सावित्रीबाई फुले यांचे संरक्षक म्हणून पाठवविले. कित्येक प्रसंगी लहूजी साळवे स्वत: देखील सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी उभे राहिले.
तसेच जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली तेव्हा त्या शाळेत कोणीही आपल्या मुलींना पाठवायला तयार होईना. तेव्हा लहूजी साळवे यांनी आपला भाऊ शिवाजी साळवे यांची मुलगी म्हणजे त्यांची पुतणी मुक्ता साळवे हिला सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत पाठवविले. त्यांच्या या पित्यासमान सहकार्याने सावित्रीबाई फुले लहूजी वस्ताद साळवे यांना बाबा म्हणून हाक मारत असे.
मुक्ता साळवे: दलित साहित्याची आद्य लेखिका
मुक्ता साळवे यांनी आपल्या लेखनातून समाजातील अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. त्यांचा पहिला लेख “मांग-महारांच्या दु:खांबद्दल”, १५ फेब्रुवारी १८५५ रोजी ज्ञानोदय मासिकात प्रकाशित झाला. त्याच लेखाचा दुसरा भाग १ मार्च १८५५ रोजी छापला गेला. मुक्ताच्या या लेखाने समाजात खळबळ माजवली आणि ब्रिटिश शैक्षणिक अहवालातही त्याची नोंद झाली.
महात्मा फुले यांच्या सत्कार समारंभात, मुक्ता साळवेंना आपल्या लेखाचे वाचन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या धाडसी लिखाणामुळे प्राचार्य कॅन्डी यांनी त्यांना चॉकलेट देऊ केले, परंतु मुक्ता साळवे यांनी त्याऐवजी “आम्हाला चॉकलेट नको, वाचनालय द्या” असे उत्तर दिले. त्यांच्या या आत्मसन्मानाने संपूर्ण समाजाला प्रेरणा दिली. अशा या दलित साहित्याच्या आद्य लेखिका मुक्ता साळवे या लहूजी वस्ताद साळवे यांची पुतणी होय. लहूजी वस्ताद साळवे यांनी मुक्ता साळवे यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित्त केले ज्या काळात महिलांना शिक्षण घेता येत नव्हते. महिलांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्याकाळी काळाच्या कितीतरी पुढचा विचार करत आपली पुतणी मुक्ताला लहूजी साळवे यांनी क्रांत्ती ज्योत्ती सावित्रीबाई फुले यांच्या शालेत दाखल केले व शिक्षण घेण्यास त्यांना प्रवृत्त केले होते. म्हणून मुक्ता साळवे यांच्या प्रगतीमध्ये लहूजी साळवे आणि सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान होते.
अंतिम काळ आणि प्रेरणादायी वारसा
इ.स. १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी पकडले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. या घटनेचा लहुजी साळवेंच्या मनावर मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी, १७ फेब्रुवारी १८८१ रोजी, पुण्यातील संगमवाडी येथील त्यांच्या झोपडीत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर एक महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. आजही त्यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करण्यासाठी अनेकजण येतात.
निष्कर्ष
लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक विस्मृतीत गेलेले पण महत्त्वपूर्ण क्रांतिकारी योद्धा आणि समाजसुधारक होते. लहुजी राघोजी साळवे हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते क्रांतीचे मार्गदर्शक आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपले स्थान अभूतपूर्व पराक्रमाने कोरले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि त्यांचा आदर्श आपण पिढ्यान् पिढ्या स्मरणात ठेवू शकतो.त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहताना आपण त्यांच्या विचारांची जोपासना करू शकतो.
लहूजी साळवे यांच्या जीवनावर आधारित युटूब वरील व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.
आमच्या इतर ब्लॉगपोस्ट
