Yeshu (Jesus) – म्हणजे मानवीय रुपात जन्माला आलेला असा एक ईश्वरपुत्र ज्याने संपूर्ण सृष्टीतील मानव जातीला प्रेम आणि करूणा शिकविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याने आपला पिता ‘परमेश्वर’ याच्या आदेशाचे पालन करताना कित्येक अपमान सहन केले, तत्कालीन क्रूर शासन व्यवस्थेचे अमानवीय अत्याचार आपल्या स्वत:च्या शरीरावर सहन केले, तत्कालीन निष्ठुर समाजव्यवस्थेचे अपमानाचे घोट पचवताना मात्र कोणत्याही मनुष्याला दोष दिला नाही. वधस्तंभावर खिळवतांना हातापायात हातोड्याने तीक्ष्ण खिळे ज्याने ठोकले, ज्यांनी अंतिम क्षणी त्यांचा उपहास केला त्यांना व एकंदरीत “मानव जातीला” येशू ख्रिस्ताने “क्षमा” केली त्यामागील महान विचार व भावना ही कि, संपूर्ण “मानवजात” ही आपला पिता परमेश्वर याची निर्मिती आहे व आपल्या परमपित्याचीच ही लेकरे आहेत. हाथापायात खिळे ठोकलेले असताना आणि वधस्तंभावर अंतिम क्षण मोजत असताना देखील, क्रूरतेची हद्द पार करणाऱ्यांसाठी “हे परमेश्वरा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत, ते यांना समजत नाही !” असे म्हणत शरीराच्या अत्यंत दयनीय अवस्थेतही स्वत:साठी आपल्या परमपित्याकडे काहीही न मागता एकंदरीत मानवजातीसाठी मात्र “क्षमा” मागणारा Yeshu (Jesus) ‘येशू’ या जगात मानवीय रुपात जन्माला आलेला एकमेव दया, क्षमा आणि करुणेचा अथांग सागर आहे म्हणून Yeshu (Jesus) ‘येशूच्या’ समान या पृथ्वीतलावर दुसरा कोणी अजून तरी झाला नाही आणि पुन्हा कोणी होईल असे दिसत नाही.
Yeshu (Jesus) येशूने दिलेले प्रेमाचे संदेश, त्यांचे नीतीमानतेवरील उपदेश, सर्व सामन्य मानवाबद्दल ची कळकळ व तळमळ तसेच दुखी, कष्टी आणि पिडीतांपर्यंत पोहचून त्यांना त्या कष्टातून व त्रासातून बाहेर काढण्याची त्याची तन, मन आणि आत्म्यापासुनची तगमग, त्यांच्यातील अतुलनीय क्षमाशीलता, मानवजातीवरील ‘भूतदया’, ईश्वराची निर्मिती असलेल्या मानावाप्रती अंतरात्म्यापासून असेलेली ‘करुणा’. त्यांनी दिलेला प्रार्थनेचा मार्ग, क्षमेचा मार्ग इत्यादी तत्वज्ञानाचा अवलंब करणे या सृष्टीत मानवजातीला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अत्यंत आवश्यक असून आजच्या जागतिक स्तरावरील स्फोटक परिस्थितीत केवळ ‘येशू’ची दया व ‘क्षमाशीलता’च मानवाला वाचवू शकते यात तिळमात्र शंका नाही.
Yeshu (Jesus) येशूचा जन्म
Yeshu (Jesus) “येशू” किंवा “जोशुआ” हे नाव हिब्रू मूळापासून आले आहे.ज्याचा अर्थ “परमेश्वर मोक्ष आहे.” असा होतो. येशूचा जन्म हे “परमेश्वराचे” पृथ्विवरील मानवजातीला प्रेम आणि करुणा शिकविण्यासाठीचे पूर्वनियोजन होते. हे आपणास पवित्र बायबल वाचताना लक्षात येईल. इस्राएल देशातील, २५ डिसेंबर रोजी तत्कालीन यहुदियांचा प्रांत असलेल्या बेथेलहेमात Yeshu (Jesus) येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तर पवित्र बायबल मध्ये वर्णिल्या प्रमाणे –
Yeshu (Jesus) येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्यांची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्याचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात देऊन म्हंटले योसेफा दाविदाच्या पुत्र तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू Yeshu (Jesus) “येशू” असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल.हे सर्व अशासाठी झाले कि प्रभुने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे ते असे .पहा कुमारी गर्भवती होईल व तीला पुत्र होईल आणि त्यला इमानुएल हे नाव देतील या नावाचा अर्थ “आमच्या बरोबर देव”.तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले व त्याने पत्नीचा स्वीकार केला.तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव “येशू”ठेवले.- मत्तय: १: १८ – २५ (बायबल )
ज्ञानी लोक Yeshu (Jesus) येशू बाळाच्या दर्शनास येतात
Yeshu (Jesus) ख्रिस्त जन्माला येईल हे पूर्व नियोजन तत्पूर्वीच्या शास्त्रलेखात नमूद होते व ते ज्ञानीजनास माहित होते मग Yeshu (Jesus) येशूच्या जन्माच्या शास्त्रातील खुणा शोधत येशूचा शोध घेण्यासाठी काही ज्ञानीजन निघाले. पवित्र बायबल नुसार-हेरोद राजाच्या काळात बेथेलहेमात येशूच्या जन्मानंतर, पहा, पूर्वेकडून मागी लोक येरुशलमेस येऊन विचारपूस करू लागले. यहुद्याचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व येरुशलेम घाबरून गेले.आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले कि Yeshu (Jesus) ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे ? ते त्याला म्हणाले यहुदियातील बेथेलहेमात कारण संदेष्ट्याच्याद्वारे असे लिहिले आहे कि, हे यहुद्याच्या प्रान्ता,बेथेलहेमा तू याहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रती पाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ निट विचारून घेतली.आणि त्यांना बेथेलहेमास पाठवतांना म्हंटले तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी हि येवून त्याला नमन करीन.राजाचे हे सांगणे ऐकूण ते निघाले, आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो, जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्याच्यापुढे चालला.तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला.नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, उद व गंधरस हि दाने त्याला अर्पिली मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
बेथेलहेम येथील मुलांची कत्तल
तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथेलहेमास व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्याच्याकडून जीवे मारले.अशाप्रकारे यापूर्वीच्या यीर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले.
Yeshu (Jesus) येशूचा बाप्तिस्मा
तेव्हा योहान नावाचा संदेष्टा परमेश्वराच्या नावात लोकांना बाप्तिस्मा देत होता.तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलाहून यार्देन नदीवर त्याच्याकडे आला. परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तीस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? Yeshu (Jesus) येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे.” तेव्हा त्याने तसे ओऊ दिले.मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलीच पाण्यातून वर आला आणि पाहा आकाश उघडले, तेव्ह त्याने परमेश्वराचा आत्मा काबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला.आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली कि, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.
अरण्यात Yeshu (Jesus) येशूची परीक्षा आणि ४० दिवसाचे उपवास
तेव्हा सैतानाकडून Yeshu (Jesus) येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.परंतु त्याने उत्तर दिले कि,”मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, असा शास्त्र लेख आहे.” मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेवून मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हंटले : तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे कि, “तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील.” आणि ‘तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हाथावार झेलून धरतील.” Yeshu (Jesus) येशूने त्याला म्हंटले: आणखी असा शास्त्र लेख आहे कि, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.पुढे शैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्वे राज्ये व त्याचे वैभव दाखविले,आणि त्याला म्हंटले,”तू पाया पडून मला नमन करशील, तर मी हे सगळे काही तुला देईन.” तेव्हा Yeshu (Jesus) येशू त्याला म्हणाला : अरे शैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे कि, “परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.” मग शैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. याच घटनेची आठवण म्हणून आजही जगातील कित्येक ख्रिश्चन लोक ४० दिवस उपवास पाळतात. व Yeshu (Jesus) येशूच्या शिकवणीचा परिपाठ करतात.
Yeshu (Jesus) येशूचे उपदेश व संदेश
इतरांचे दोष न काढण्याविषयी Yeshu (Jesus) येशूचे संदेश
समाज व परिवारातील प्रेम व सौहार्दास आजही घातक असलेली गोष्ट म्हणजे “इतरांचे दोष काढणे” व इतराना दुषणे देणे. म्हणून Yeshu (Jesus) येशू ख्रिस्ताने या विषयावर विविध ठिकाणी आपल्या उपदेशातून स्पष्टपणे सांगितले कि, तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.कारण ज्याप्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. हेच वेगळ्या पद्धतीने समजावतांना येशू म्हणतात, तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील ? पाहा, तुझ्या डोळ्यात तर अगोदरच मुसळ आहे. तर अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यात तुला स्पष्ट दिसेल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या नजरेतील वाईटपणा जर काढण्याचा प्रयत्न केला तर समाजातील व परिवारातील तसेच व्यक्ती -व्यक्ती मधील आदरभाव वाढीस लागून एकमेकांच्या मनात एकमेकाविषयी प्रेम व आदरसन्मान निर्माण होऊ शकेल. सर्व सामन्य लोकांना अत्यंत सोप्या भाषेत Yeshu (Jesus) येशूने प्रेमाचे मोठ मोठे पाठ या पद्धतीने देण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला.
कायदा व नितीमत्ते संबंधीत Yeshu (Jesus) येशूचे उपदेश
ज्याकाळी क्रूरता व क्रूर शासनव्यवस्था त्याच्या पूर्ण शिगेला पोहचलेली होती त्यावेळी त्याविरुद्ध Yeshu (Jesus) येशूने सांगितलेल्या परमेश्वराच्या महत्वाच्या दहा आज्ञेपैकी एक अत्यंत महत्वाची आज्ञा जी सांगितली ती म्हणजे ‘खुन करू नकोस‘, कोणत्याही मनुष्याबद्दल इतर कोणत्याही मनुष्याला एवढा जिव्हाळा व प्रेम निश्चितच असावे कि त्यांच्या मनात कोण्याही मनुष्याला मारण्याचा विचारदेखील शिवला नाही पाहिजे. एक खून कित्येक गुन्ह्यांना जन्म देतो व ते गुन्हे अधिक गुन्हेगार तयार करतात व या गुंन्ह्यंची संख्या वाढून समाजाचे आपसातील प्रेम, सौहार्द व बंधुभाव आपोआप लयास जाऊन मनुष्य परमेश्वरापासून दूर जातो कारण संपूर्ण सृष्टीतील ‘मानव’ हे ईश्वराची निर्मिती आहे आणि त्याचे जीवन व मृत्यू परमेश्वराच्या अधिकारक्षेत्रातील बाब आहे त्यामुळे कोण्याही मनुष्याचे आयुष्य कोण्याही इतर मनुष्याला संपवण्याचा अधिकार परमेश्वराने कोण्याही मनुष्याला दिलेला नाही. तसेच मानवीय आयुष्याला जर खरोखर किंमत दिली तरच आपल्या अस्तित्वाला मानव म्हणून अर्थ आहे अन्यथा आपल्यात व प्राण्यात फरक काय राहील? म्हणून Yeshu (Jesus) येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानव जातीस “‘खुन करू नकोस’ असे निक्षून सांगितले व हि आज्ञा पाळ म्हणून निक्षून सांगितले.
वाद मिटविण्यासाठी वाद्याशी समेट करण्याबाबत येशूचे विचार
वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील व दमडी न दमडी फेडेपर्यंत तू त्यांच्यातून सुटणार नाहीस.असे येशूने दोन हजार वर्षांपूर्वी सांगितले होते हे विचार व उपदेश आजही प्रासंगिक आहेत. आजच्या काळातील न्यायव्यवस्थेतील सर्वसामान्यांची परिस्थिती एखाद्या जाळ्यात अडकल्या सारखीच झालेली असून, न्यायदान मिळणे कठीण होऊन गेले आहे. त्यामुळे मानवीय जीवन विकास पावण्यासाठी त्याने वादांपासून आपणास सोडवले पाहिजे व कोणतेही वाद सामोपचाराने सोडवले पाहिजे.
व्यभिचार करू नकोस
शैतान व्यभिचाराचा उपयोग करून मानवाला परमेश्वरापासून दूर घेऊन जात आहे हे Yeshu (Jesus) येशू ओळखून होते म्हणून एकंदरीत मानव जातीस ‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून त्यांनी निक्षून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले असेलच. एवढेच काय तर येशूच्या मते जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. म्हणून आपले अंतर्मन शुद्ध करून प्रत्येक मानवाने आपल्या मनातील परस्त्री बद्दलचा भाव बालकाप्रमाणे ‘निर्मळ’ केल्या खेरीज या आज्ञेचे पालन होऊ शकत नाही. त्याहीपुढे जाऊन येशू म्हणतात कि, तुझा उजवा डोळा जर तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. व्याभिचाराविषयी विवाहितांना संदेश देतांना येशू म्हणतो, ‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे (येशूच्या अगोदरच्या) शास्त्रात सांगितले होते पण मी तर तुम्हाला सांगतो कि, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो सुद्धा व्यभिचार करतो. म्हणून मनुष्यातील प्रेमामध्ये पावित्र्य राखल्या गेल्या खेरीज, विश्वास दृढ होणार नाही आणि “विश्वासच” प्रेमाचा आधारस्तंभ आहे म्हणून संपूर्ण सृष्टीचा निर्माता परमेश्वर याची अपेक्षा मानवाकडून “व्यभिचार” त्यागाची आहे कारण व्यभिचार हा शैतानाची निर्मिती आहे तर ‘निष्पाप प्रेम’ ही परमपिता परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणून Yeshu (Jesus) येशूने आपल्या प्रिय मानवास अंतरात्म्यापासून हाक दिली कि तू “व्यभिचार करू नकोस.”
व्यभिचारी स्त्रीबद्दल Yeshu (Jesus) येशूचा न्याय
एकवेळी Yeshu (Jesus) येशूला कैचीत पकडण्यासाठी व दोष लावण्यासाठी म्हणून टपून बसलेल्या तत्कालीन समाजातील शास्त्री व परुशी यांनी व्यभिचार करताना धरलेल्या एका स्त्रीस पकडून Yeshu (Jesus) येशूकडे आणले व ते म्हणाले,”गुरुजी हि स्त्री व्यभिचार करत असतांना धरण्यात आली, मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे कि, अशांना दगडमार करावा तर, आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावता यावा म्हणून आपणास काहीतरी मिळावे म्हणून ते त्याला असे म्हंटले. असे एकसारखे विचारात असताना येशू उठून त्यांना म्हणाला,”तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” हे ऐकून वृद्धातल्या वृद्धा पासून ते थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक तेथून निघून गेले, Yeshu (Jesus) येशू एकटा राहिला नंतर Yeshu (Jesus) येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नसताना तिला म्हणाला,”बाई तुला दोष देणारे कोठे आहेत?, तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली ,”प्रभुजी कोणी नाही.” तेव्हा तो तिला म्हणाला,”मीही तुला दंड ठरवत नाही, जा; यापुढे पाप करू नकोस.”
“खोटी शपथ उलट जीवनातील सत्य वागणूक आणि व्यवहार” या बद्दल Yeshu (Jesus) येशू ख्रिस्ताचे विचार
जसे आपण पेरतो तेच उगवते जर आपण बाभळीचे ‘बी’ पेरले तर त्यापासून बाभळीचे झाड जन्म घेईल व त्याला आंब्याचे फळ लागणार नाही तसेच जर आपण आंब्याचे बीज पेरले तर त्यापासून बाभूळ कधीच उगवणार नाही. हाच सृष्टीचा व परमेश्वराचा नियम आहे. आपल्या मुखातून निघणारे ‘शब्द’ हे त्या बिजाप्रमाणेच आहेत जर हे शब्द चांगले असतील तर त्याची पेरणी होऊन त्याला चांगला वृक्ष लागेल व चवदार फळे त्याला लागतील परंतु आपल्या मुखातून निघणारे शब्द जर वाईट व तीक्ष्ण काट्यासारखे असतील तर त्याची पेरणी होऊन त्याला खूप मोठ्या प्रमाणात लागणारे वाईट फळे व काटेच लागलेली मिळतील. आपले मुख, जीभ व वाणी परमेश्वराची आपणास देन आहे जेव्हा आपण यातून शब्द रुपी बीज बाहेर टाकतो तर त्याचे झाड व फळ आपणास त्या शब्दाच्या परिणाम स्वरुपातच मिळत असतात. म्हणून आपल्या मुखातून खोटी शपथ घेऊन त्याला लागणारे चुकीचे व वाईट फळ मिळविण्यापेक्षा, Yeshu (Jesus) येशूने मानवजातीस सांगितले कि, शपथ वाहुच नका, स्वर्गाची, पृथ्वीची, यरूशलमेची नाही, आपल्या मस्तकाचीही नाही कारण आपल्या डोक्याचा एकही केस आपण काळ्याचा पांढरा आणि सफेद चा काळा करू शकत नाही. म्हणून आपल्या मुखातून निघणारे शब्द केवळ शब्द नसून ते निर्मितीची क्षमता असलेल्या देवा समान आहेत व म्हणून बायबल चे एक वचन सांगते ते असे कि, “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता व शब्द देव होता” हे पवित्र बायबलचे वचन केवळ वचन नसून हा सृष्टीच्या निर्मितीतील एक महत्वपूर्ण नियम आहे. म्हणून खोटे वचन व खोट्या शपथा वाहण्याऐवजी आपल्या सत्य वचन, सत्यवादी वर्तणुकीतून व सत्य व्यवहाराचे आचरन करून चांगले फळ प्राप्त केले पाहिजे व त्यायोगे परमेश्वराला आपल्या जीवनात स्थान दिले पाहिजे. कारण परमेश्वराचा वास हा सत्यात, चांगुलपणात व चांगल्या फळात आहे तर खोट्यात आणि वाईटात नाही.
वाईट विरुद्ध चांगुलपणाबद्दल Yeshu (Jesus) येशूचे विचार
आपल्या अंगी असणारा चांगुलपणा हा कायम तसाच असावा तो कोण्या वाईट वागणुकीचा व्यक्तीसाठी आपण सोडला नाही पाहिजेत, या उलट तुमच्यातल्या चांगुलपणा इतका खरा व ठाम असावा कि वाईटाला त्याच्याअंगी असलेल्या वाईटाचा अनुभव व्हावा व त्याने त्या वाईटाचा त्याग करून तुमच्यातील सत्यप्रकाश व चांगुलपण आत्मसात करावे आणि वाईटापासून चांगुलपणाकडे त्याचा प्रवास सुरु व्हावा. म्हणून Yeshu (Jesus) येशू म्हणतात ‘मी तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नका, जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे डावा गाल कर,जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ इच्छितो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे,आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,येशू म्हणतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
धार्मिक गुप्ततेबद्दल Yeshu (Jesus) येशूचे विचार
धर्म आणि ईश्वर ही मानवाची अत्यंत गोपनीय बाब आहे कारण प्रत्येक मानव केवळ त्याच्या मनापासून व केवळ आत्म्यापासून ईश्वराशी जोडला जाऊ शकतो त्याकरिता इतर कोणतेही मार्ग उपयोगी पडत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपल्या ईश्वरास मागणे मागताना व आर्जव करताना म्हणजेच प्रार्थना करताना त्या खाजगीतच असव्यात म्हणून गुप्त प्रार्थनेबद्दल Yeshu (Jesus) येशू म्हणतो, “आपल्या खोलीत जा व दर लाऊन घेऊन मग आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर.” तसेच धर्माचरणाबद्दल त्यांनी सांगितले कि आपले धार्मिक आचरण हे गुप्त असावे. दान धर्म करत असतांना त्याचा प्रचार नको, त्याचे अवास्तव स्तोम नको, ज्यातून उच्च नीचतेचा फरक मानव जातीत निर्माण होईल व माझे दान मोठे व त्याचे दान लहान, मी श्रेष्ठ तर तो कनिष्ठ हा भेदभाव नसावा कारण ईश्वरास त्याची सर्व लेकरे समान असतांना केवळ दानधर्मामुळे त्यांच्यात उच्च नीचता आणि जेष्ठ कनिष्टता निर्माण होत असेल तर ‘दानाचा’ उद्देश साध्य होणारच नाही म्हणून येशू म्हणतो,”जेव्हा तू दान धर्म करत असशील तेव्हा तुझा उजवा हाथ काय करतो हे डाव्या हातालाही कळू नये.” तशीच भावना उपवासाबद्दल बोलताना येशू म्हंटले,”आपण उपवास करत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून तोंड विरूप करू नको तर कोणालाही कळणार नाही असा तू उपवास कर.”
Yeshu (Jesus) येशू म्हणतो स्वर्गात संपत्ती जमव.
मानवाने पृथ्वीवर केलेल्या संपत्तीची जमवा जमव ही निरुपयोगी आहे कारण पृथ्वीवरील संपत्ती चोरीला जाऊ शकते आणि ती नष्ट तर निश्चितच होईल परंतु जर ज्याने आपल्या सत्य व प्रेमळ व्यवहार, गुप्त धर्माचरण, चांगुलपण व भूतदयेने परमेश्वराचे घर असलेल्या स्वर्गात संपत्ती जमवली तर ती चोरीस न जाणारी आणि कायमस्वरूपी टिकणारी असणार आहे. म्हणून Yeshu (Jesus) येशू ख्रिस्ताने असे म्हंटले कि, “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठव, तेथे ती नाश पावणार नाही आणि चोर चोरी करत नाही, जेथे तुझे धन आहे तेथेच तुझे मनही लागेल.” याप्रमाणे जर संपत्ती धरतीवर असेल तर त्याचे मन धरतीवरच लागून राहील व स्वर्गास धजणार नाही पण याउलट धरतीवर संपत्ती न कमावता स्वर्गात संपत्ती कमावण्यासाठी धरतीवर प्रयत्न केल्यास स्वर्गातील जमा झालेल्या संपतीवर त्याचे मन खिळून राहील व मनुष्य स्वर्गाच्या मार्गावर मार्गक्रमण करेल जे परमेश्वराला अपेक्षित आहे.अन्न व वस्त्रासाठी उद्याची चिंता करत बसू नका, उद्याची चिंता उदयाला, ज्या दिवसाचे दुख: त्या दिवसाला पुरे.
येशूचे Yeshu (Jesus) बंधूप्रेमाविशायीचे उपदेश
भावावर प्रीती करण्याविषयी येशू उपदेश करताना एकवेळ असे म्हणाले, “मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला ‘अरे वेडगळा’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मुर्खा’, असे म्हणेल तो नराकाग्नित शिक्षेस पात्र होईल.ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदिजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले.तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येवून आपले दान अर्पण कर. अशा शब्दात Yeshu (Jesus) येशूने प्रत्येकाने आपला सखा, सोबती, आपला शेजारी आपला भाऊ यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेमभावना कायम ठेऊनच जीवनक्रम पुढे चालवावा तर आणि तरच पिता परमेश्वर प्रसन्न होईल असे संदेश तत्कालीन समाजाला त्यांना समजतील या भाषेत दिले.
येशूचे Yeshu (Jesus) विविध दैवी चमत्कार
Yeshu (Jesus) येशूने कुष्ठरोग्यास व अन्य रोग्यास बरे केले
एके दिवशी येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला “प्रभुजी,आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात, मग Yeshu (Jesus) येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केले व म्हंटले”माझी इच्छा आहे शुद्ध हो;” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. व तो कुष्ठरोगी पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे येशूने पाहिले तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला, आणि ती उठून त्याची सेवा करू लागली.मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने त्यांची भुते शब्दांनीच घालविली व सर्व दुखणेकरी आले होते त्यांना बरे केले.
येशूने Yeshu (Jesus) वादळ शांत केले
एकदा Yeshu (Jesus) येशू व त्याचे शिष्य तारवातून जात असतना वादळ आले तेव्हा तारू वाऱ्याने झाकू लागले, त्यावेळी येशू झोपलेला होता व त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले “प्रभुजी वाचवा, आम्ही बुडालो.” अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे?’ मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकावले आणि ते अगदी निवांत झाले.” तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले कि “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे कि वारे व समुद्र ह्याचे ऐकतात !” – मत्तय :८:२६, २७
पक्षाघाती माणसाला येशूने Yeshu (Jesus) ठीक केले
बाजेवर पडून असलेल्या कोण्या एका व्यक्तीला येशूकडे आणले तेव्हा त्यांचा विश्वास पाहून Yeshu (Jesus) येशू म्हणाला “मुला, धीर धर,तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”. मग कित्येक शास्त्री मनात म्हणाले ‘हा दुर्भाषण करतो ‘येशू Yeshu (Jesus) त्यांच्या मनातील कल्पना ओळखून म्हणाला “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना ओळखून म्हणाला “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता?” कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे, किंवा उठून चाल असे बोलणे, ह्यातून कोणते सोपे? मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला “उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” मग तों मनुष्य उठून आपल्या घरी गेला.
Yeshu (Jesus) येशूने मृत कन्येस जिवंत केले
कोणी एक अधिकारी येशूच्या पाया पडून म्हणाला “माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हाथ तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल” तेव्हा तिच्याकडे जात असताना, रस्त्याने जात असताना रक्तश्रावणे पिडीत एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली व ती मनात म्हणत होती कि, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरीही मी बरी होईल, तेव्हा Yeshu (Jesus) येशूने मागे वळून पाहिले व म्हणाला “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू त्या अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पाव वाजवणाऱ्या व गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणाला’वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते लोग त्याच्यावर हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली.मत्तय:९ : १८ ते २५
Yeshu (Jesus) येशूने दिली आंधळ्यांना दृष्टी
एका ठिकाणाहून जात असताना दोन आंधळे व्यक्ती येशूच्या Yeshu (Jesus) मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले “अहो दाविपुत्र आम्हावर दया करा”तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा Yeshu (Jesus) येशू त्यांना म्हणाला “हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय ?” तेव्हा ते त्याला म्हणाले “होय, प्रभू” तेव्हा येशूने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून म्हंटले , “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो.”तेव्हा त्यांना दृष्टी आली व ते पाहू लागले.
मुक्या भूतग्रस्ताचे भूत काढून त्याला वाचा आणीली
एका मुक्या भूतग्रस्ताला Yeshu (Jesus) येशूकडे आणले असता येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली, तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले “इस्राइलात असे कधीही पाहण्यात आल नव्हते”
फक्त सात भाकरी व मासे आणि येशूचे चार Yeshu (Jesus) हजारांना भोजन
एकवेळी खूप मोठा जनसमुदाय Yeshu (Jesus) येशूच्या मागे कोणी आजारातून बरे होत, तर कोणी आप आपल्या समस्यातून मुक्त होत व उपदेश ऐकत चालले असताना रानात जाऊन हा सर्व जनसमुदाय पोहचला. यावेळी Yeshu (Jesus) येशू शिष्याला बोलावून म्हंटला “मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खाण्यास काहीही नाही; कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यांस उपाशी लाऊन द्यावे अशी माझी इच्छा नाही.” शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार?” येशूने त्यांना विचारले “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे.” मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसण्यास सांगितले, नंतर त्याने त्या सात भाकरी व मासे घेऊन उपकारस्तुती केली. त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या, मग ते सर्व जेऊन तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या. जेवणारे चार हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया व मुले देखील होती.येशूने शिकवलेली परमेश्वराची/प्रभूची प्रार्थना सर्वसामान्य जनतेस आपल्या ईश्वराला हाक मारण्यासाठी व त्याच्यासोबत जोडल्या जाण्यासाठी प्रार्थना करावयास सांगितल्या. स्वत: येशू ख्रिस्त दुखी, कष्टी जणांसाठी आपल्या पवित्र परमेश्वराच्या नावाने गुढग्यावर बसून प्रार्थना करत असे. परंतु अश्या प्रार्थना सर्व सामान्यांना देखील करता याव्यात व त्याला ईश्वराशी संपर्क स्थापित करता यावा, मानवाचे वाईटापासून रक्षण व्हावे व सत्याच्या मार्गातून त्याचे मन विचलित होऊ नये या करिता येशू ख्रिस्ताने सांगिलते कि,”तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा:
हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही
तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे;
आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे
तशी तू आमची ऋणे आम्हास सोड;
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस
तर आम्हास वाईटापासून सोडव.
कारण कि राज्य, सामर्थ्य आणि गौरव हि सर्वकाळ तुझीच आहेत: आमेन.
परमेश्वराची येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना
प्रार्थना करण्यास प्रोत्साहन
मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे का? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल ? म्हणून प्रार्थनेतून आपण परमेश्वराच्या सतत संपर्कात राहिले पाहिजे. म्हणजे तो आपला सर्वांचा पिता परमेश्वर जो सर्व काही जाणतो तो आपणास कोणतीही उणीव पडू देणार नाही.
येशूचे Yeshu (Jesus) स्वत:चे मरण व पुनरुत्थान याविषयी भविष्यवाणी
एके दिवशी अचानक Yeshu (Jesus) येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला कि,” मी यरुशलमेस जाऊन वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे.” तेव्हा त्यांच्या शिष्यांपैकी एक असलेला पेत्र त्याला जवळ घेवून त्याचा निषेध करून म्हणाला, “प्रभुजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.”परंतु तो वळून त्याला म्हणाला,”अरे सैताना माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, तर माणसांच्या आहे.”
Yeshu (Jesus) येशूला ठार मारण्याचा कट
Yeshu (Jesus) येशूने आपल्या शिष्यास म्हंटले,”तुम्हाला ठाऊक आहे कि, दोन दिवसांनी वल्हांडन सण आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरिता धरून दिला जाईल.” तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक व लोकांचा वडील वर्ग जमला. आणि येशूला कपटाने धरून जीवे मारावे अशी त्यांनी मसलत केली. परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये, म्हणून हे सणात नको.”
यहुदाची फितुरी
तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या येशूच्या बारातील एका शिष्याने मुख्य याजकाकडे जाऊन म्हंटले: “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” “त्यांनी त्याला ३० रुपये तोलून दिले.” तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला.
Yeshu (Jesus) येशूला अटक
मग एके ठिकाणी येशू Yeshu (Jesus) उपदेश देत असतांना, तो बोलत आहे इतक्यात बारातील एक जो यहुदा होता तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांचेकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यास असी खुण सांगून ठेवली होती कि, “मी ज्याचे चुंबन घेईल तो तोच आहे, त्याला धरा.”मग त्याने लगेचच येशू जवळ येऊन, “गुरुजी सलाम” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हंटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्याने जवळ येऊन Yeshu (Jesus) येशूवर हाथ टाकून त्याला अटक केली मग पहा Yeshu (Jesus) येशुबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हाथ लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा Yeshu (Jesus) येशू त्याला म्हंटला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील.” तुला असे वाटते काय कि, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देव दूतांच्या बारा सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही काय ? पण असे झाले तर या प्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?”त्यावेळेसच Yeshu (Jesus) येशू लोकसमुदायास म्हणाला,”एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरण्यास तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय ? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही. पण संदेष्ट्याचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
Yeshu (Jesus) येशूची चौकशी
मग Yeshu (Jesus) येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता, सुभेदाराने त्याला विचारले,”तू यहुद्याचा राजा आहेस काय ? ” येशूने Yeshu (Jesus) त्याला म्हंटले आपण म्हणता तसेच.” मुख्य याजक व वडील हे त्यांच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला,”हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टीबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकु येत नाही काय ?” परंतु त्याने एकही आरोपाला काहीच उत्तर दिले नाही, याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणात लोक सांगतील तो एक बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. आणि त्यावेळेस तेथे बराब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता. म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यास म्हंटले,” मी तुमच्याकरीत कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बराब्बला किंवा ख्रिस्त म्हंटलेल्या Yeshu (Jesus) येशूला?” कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला कि, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.” इकडे मुख्य याजक व वडील यांनी बराब्बला मागून द्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळविले. सुभेदाराने त्यास विचारले?”तुमच्या करिता या दोघातून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” तर ते म्हाणाले “बरब्बाला” पिलाताने त्यास म्हंटले,”तर Yeshu (Jesus) ख्रिस्त म्हंटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, ” त्याला वधस्तंभावर खिळवून टाका.” तो म्हाणाला,”का बरे? त्याने काय वाईट केले आहे ?” तेव्हा ते फारच आरडा ओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळवून टाका.” यावरून आपले काही चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धूत म्हंटले,”मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुम्हीच पहा.” सर्व लोकांनी उत्तर दिले कि ,”त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुला बाळांवर असो”. तेव्हा त्याने त्यांच्या करिता बराब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरिता शिपायाच्या स्वाधीन केले.
येशूला वधस्तंभावर खिळतात.
नंतर सुभेदाराच्या शिपायाने Yeshu (Jesus) येशूला वाड्यात नेले व सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमवली. त्यांनी त्याचे वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला. काट्याचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला व त्याच्यापुढे गुढगे टेकून हे यहुद्याचा राजा” नमस्कार !” असे म्हणून त्याने त्याची थट्टा मांडली ते त्याच्यावर थुंकले, व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्यास घेऊन गेले. ते बाहेर जात असता, शिमोन नावाचा कोणी एक कुरेनेकर मनुष्य त्यास आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा येथे येऊन पोहोचल्यावर त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित’ द्राक्षरस पिण्यास दिला परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.त्याला वधस्तंभावर खिळल्यावर ‘त्यांनी चिठ्ठ्या टाकून’ त्याची वस्त्रे वाटून घेतली.नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला ; तो असा : हा याहुद्यांचा राजा येशू आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. आणि जवळून जाणारे येणारे ‘डोकी डोलवित’ त्याची निंदा करत होते कि, “अरे, मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्या तू देवाचा पुत्र असलास तर स्वत:चा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.’
तसेच मुख्य याजक,शास्त्री, वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले,”त्याने दुसऱ्याला वाचवले; त्याला स्वत:ला वाचवता येत नाही; तो इस्राएलचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ.तो देवावर भरवसा ठेवतो, त्याला हवा असेल तर त्याने त्याला “आता सोडवावे”, कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे. जे लुटारू त्याच्यासह वधस्तंभावर खिळले होते त्यांनीही त्याची निंदा केली.
Yeshu (Jesus) येशूचा मृत्यू
मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला; आणि सुमारे नवव्या तासाला Yeshu (Jesus) येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली,एली, लमा सबखथनी” म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास?’तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे एकूण म्हंटले, “तो एलियाला हाक मारतो.” मग त्याच्यातून एकाने धावत जाऊन लगेच स्पंज घेतला आणि तो आम्बेने भरून बोरुच्या टोकावर ठेऊन त्याला ‘चोखण्यास दिला’ इतर म्हणाले “असू दे एलिया त्याचा बचाव करण्यास येतो कि काय, हे आपण पाहू.” मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा पवित्रस्थानातील पडदा फाटला, भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली. शताधीपती व त्याच्याबरोबर येशूवर फार करणारे, हा भूमीकंप पाहून व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले.
Yeshu (Jesus) येशूची उत्तरक्रिया
मग संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन Yeshu (Jesus) येशूचे शरीर मागितले तेव्हा पिलाताने ते देण्याची आज्ञा केली. योसेफने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले ते त्याने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले.एक मोठी धोंड लोटून कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण कबरीसमोर मग्दलीया मरिया व दुसरी मरिया बसल्या होत्या.दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलाताकडे जमून म्हणाले,”महाराज, ठक जिवंत असता “तीन दिवसानंतर मी उठेन’ असे म्हणाला होता याची आम्हाला आठवण आहे; म्हणून तिसऱ्या दिवसापर्यंत कबरीचा बंदोबस्त करण्यात सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येवून त्याला चोरून नेतील व तो ‘मेलेल्यातून उठला आहे असे सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. “पिलात त्यास म्हणाला ,” तुमच्याजवळ पहारा आहे, जा तुमच्याने जे होईल ते तसा बंदोबस्त करा.” मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून कबरीचा बंदोबस्त केला.
Yeshu (Jesus) येशूचे पुनरुत्थान
आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहण्यास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येवून धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते, त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदुताने त्या स्त्रियास म्हंटले,”तुम्ही भिऊ नका, वधस्तंभावर खिळलेल्या Yeshu (Jesus) येशूचा शोध तुम्ही करत आहात; हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला ते हे स्थळ पहा; आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांस सांगा कि, तो मेलेल्यातून न उठला आहे; पहा तो तुमच्या आधी गालीलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल” तेव्हा त्या स्त्रिया भितीने व हर्षअतिशायाने कबरीपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. मग येशू त्यास भेटून म्हणाला “कल्याण असो”, त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हंटले “भिऊ नका; जा माझ्या भावास सांगा कि, त्यांनी गालीलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.” त्या जात असता पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले, तेव्हा त्याने व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले कि, “आम्ही झोपेत असताना त्याची शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले, असे म्हणा; आणि हि गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू.”मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले; आणि हि जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यत चालू आहे.
Yeshu (Jesus) येशुंचे बारा शिष्य
येशूच्या जीवनक्रमात त्यांच्या शिष्यांचे तेवढेच महत्व होते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येशू सोबत जोडल्या गेले. त्यापैकी काही जन त्यांच्या विचारांचे खरे समर्थक झाले त्यांनी येशूच्या स्वर्गप्रवेशानंतर,त्यांच्या विचारांना जगभरात प्रचारित व प्रसारित केले त्यांनी जगाचा द्वेष झुगारून येशूची दया व क्षमाशीलता पृथ्वीवरील एकंदरीत मानवजाती पर्यंत पाहोचवण्याचा प्रयत्न मरेपर्यंत केला. त्याकरिता त्यांना शेवटी त्रासदायक मृत्यूस सामोरे जावे लागले मात्र ते आपल्या ध्येय व उद्दिष्टांपासून ढळले नाहीत. अशा येशूच्या बारा प्रेषितांविषयी आता आपण जाणून घेऊ.
येशूच्या बारा शिष्यांची नावे व कार्ये.
येशूचा पहिला शिष्य पेत्र म्हंटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलीप व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फिचा मुलगा याकोब व तद्दय शिमोन कनानी व Yeshu (Jesus) येशूला धरून देणारा यहुदा इस्कर्योत
१) पेत्र (पीटर) – पेत्राने केलेल्या प्रचारातून ३००० लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन बाप्तिस्मा घेतला, पेत्राने रोम मध्ये प्रचार केला, दरम्यान क्रूर रोमन सम्राट निरो द्वारे, अगोदर पेत्रस च्या मुलांना व पत्नीला जिवंत मारले गेले व नंतर, रोम मधील टायबर नदी जवळ, आपण येशू ख्रिस्ताएवढे महान नाहीत म्हणून त्याच्यासारखे क्रुसावर लटकावण्याएवजी पेत्रा च्या सांगण्यावरून क्रुसावर त्याला उलटे लटकावून मारले गेले.
२) शिमोन (सायमन द जीलोट)- येशूच्या स्वर्गवासानंतर क्रुसावर उलटे लटकावून स्वत:हून मरण मागितले.
३) आंद्रिया – आंद्रिया चा अर्थ बहादूर, सर्वात पहिला शिष्य नंतर त्याचा भाऊ पेत्रस येशूचा शिष्य झाला, x आकाराच्या क्रुसावर स्वेच्छेने लटकाउन घेऊन मरण पत्करले. क्रुसावर खिळ्याने न ठोकता रस्सीने बांधले गेले, त्याअवस्थेतहि प्रचार केला व शेवटी तीन दिवसांनी मृत्यू पावला.
४) याकोब (जब्दीचा पुत्र):- याकोब या शब्दाचा अर्थ होतो लुभावणारा किंवा मागे राहणारा, याकोब येशू ख्रिस्ताचा शहीद होणारा पहिला शिष्य होता, येशूच्या स्वर्गवासानंतर तो येरुशलमेत प्रचार करत होता. हेरोदेस राजाने त्याला पकडून त्याचे मुंडके धडावेगळे केले व त्याचा मृत्यू झाला.
५) योहान – योहान चा अर्थ ‘परमेश्वर दयाळू आणि अनुग्रह करी आहे’ असा होतो , योहान हा येशूचा प्रिय शिष्य होता, तो नेहमी येशूच्या छातीला डोके लाऊन बसत असे. योहान वृद्धावस्थेत मृत्यू पावणारा एकमेव येशूचा शिष्य होता, उकळत्या तेलात योहानला टाकले गेले परंतु चमत्कारिकरित्या त्याला काहीच झाले नाही, योहानचा शेवटी प्राकृतिक मृत्यू झाला.
६) फिलीप – फिलीप नावाचा अर्थ घोड्यांचा मित्र असा होतो, तुर्की मध्ये प्रचार केला, सम्राट डोमेषणनी त्याला पकडून, उलट्या क्रुसावर लटकावले व त्याचा मृत्यू झाला
७) बर्थलमय (बर्थोलोमियू)- बर्थलमय या शब्दाचा अर्थ ‘तुल्मय चा पुत्र’ असा होतो, याने भारतासह इतर अन्य देशांमध्ये प्रचार केला,आर्मेनिया मधील बार्पूस नावाच्या राजाने,बर्थलमयची चामडी सोलून काढली व त्याला क्रुसावर लटकावले.मग त्याचे शीर कापून टाकले व त्याच्या मुलाला समुद्रात फेकून दिले.
८) थोमा – थोमा या नावाचा अर्थ होतो जुळा (जुडवा), येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळी याने म्हंटले होते जो पर्यंत मी येशूच्या पोटात मारलेल्या भाल्याच्या जागी झालेल्या छिद्रात हात घालून पाहत नाही तो पर्यंत मी विश्वास ठेवणार नाही, व त्याने येशूच्या प्रगटनावेळी तसे केले देखील, त्याने मध्य पूर्व आशिया खंड, नंतर भारतात सुद्धा प्रचार केला,चीन, उत्तर भारत, पंजाब आणि केरळ इत्यादी ठिकाणी प्रचार केला.जेव्हा तो भारतात केरळ मध्ये मालापुर च्या पहाडावर प्रार्थना करत होता तेव्हा लोकांनी त्यांना भाल्याने भोसकून मारले.हे ठिकाण सध्या St. Thomas Mount म्हणून ओळखले जाते.
९) मत्तय – मत्तय या नावाचा अर्थ होतो ‘परमेश्वराचे दान‘- इथोपिया, मेसोडोनिया , सिरीया, काही जनाच्या मते इथोपिया मध्ये तलवारीने मारले गेले.
१०) याकोब (हलफाईचा पुत्र)- येशू ख्रिस्तांच्या स्वर्गवासानंतर याकोबाने येरुशलमेत, यहुदी लोकांमध्ये प्रचार केला. यहुदी लोकांनी दगडांचा वर्षाव करून यास मारून टाकले.
११) शिमोन कनानी- येशूचा च्या दोन शिष्यांचे नाव सारखेच म्हणजे शिमोन होते मग त्यातील एकाचे नाव शिमोन कनानी असे ठेवले गेले. त्याने ब्रिटेनच्या लंडन मध्ये प्रचार केला, काहींच्या मते तो स्वाभाविक मृत्यूस प्राप्त झाला, तर काहींच्या मते त्याला सुळीवर चढवल्या गेले, तर काहींच्या मते त्यांच्या शरीराचे दोन भागात विभाजन करून त्याना मारले गेले होते.
१२) यहुदा इस्कर्योत – यहुदा इस्कर्योत या नावाचा अर्थ ‘स्तुतीस पात्र’ असा होतो, परमेश्वराने यहुदा इस्कर्योत कडून असे कार्य करून घेतले कि तो इतिहासात लोकांच्या संतापास पात्र ठरला. कारण यहुदा इस्कर्योत यानेच येशू ख्रिस्ताला ३० रु च्या बदल्यात पकडून दिले होते व त्याच्याजवळ दानाची थैली राहत असे व ज्यातून तो पैसे काढून घेत असे. नंतर ख्रिस्तांच्या स्वर्गवासानंतर येशू ख्रिस्ताला पकडून देण्याच्या बदल्यात घेतलेले ३० रुपये त्याने नेऊन मुख्य याजकासमोर फेकून दिले व फाशी घेऊन तो मृत्यूपावला.
आजच्या युगातील जगातील सुप्रसिद्ध व्यक्तींचे येशू ख्रीस्तांविषयी मते
आमच्या इतर ब्लॉग विषयी अधिक महातीसाठी खाली लिंक देत आहोत.
Gautam Buddh- गौतम बुद्ध -बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
गुरुनानक – गुरुनानाकांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.