भारतीय इतिहासात मुरुड जंजिरा-Murud Janjira हा एक असा किल्ला आहे जो त्याच्या निर्मितीपासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत शेकडो वर्षांपर्यंत अजिंक्य राहिला आहे, तो कोणालाही जिंकता आला नाही. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज, विदेशातून आलेले डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि किल्ल्याच्या बाहेरील इतर कोणालाही जंजिरा किल्ला शेवटपर्यंत जिंकता आला नाही.
- Janjira- “जझीरा” चा काळाच्या ओघात जंजिरा झाला
- Murud Janjira – मुरुड जंजिरा आहे काय ? कुठे ?
- Janjira Fort – जंजिरा किल्ला पूर्वकथा व इतिहास
- Murud Janjira Fort- मुरुड जंजिरा किल्ला निर्माण आणि सिद्दी
- Murud Janjira येथे चोहो बाजूने अरबी समुद्राचे खारे पाणी तर मध्यभागी गडावर गोड पाणी
- Janjira Fort जंजिरा किल्ल्या बद्दल
- Murud Janjira या अजिंक्य किल्ल्याचे भारतात विलीनीकरण
- Murud-Janjira Photos
- FAQ
Janjira- “जझीरा” चा काळाच्या ओघात जंजिरा झाला
Murud Janjira- जझीरा हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ चोहो बाजूने पाण्याने वेढलेला म्हणजेच बेट असा होतो ज्याचा अपभ्रंश नंतर कालांतराने होत गेला व जझीरा चा जंजिरा असा शब्द रूढ झाला. इतिहासात या किल्ल्याचे नाव “जझीरा ए मेहरूब” होते असे आढळते मेहरूब चा अर्थ होतो “चंद्रकोर”. म्हणजेच चंद्रकोराप्रमाणे असलेले बेट असा अर्थ आपण काढू शकतो. समुद्रात दिसत असलेल्या त्याच्या स्वरूपावरून कदाचित हे नाव त्याला ठेवले गेले असावे.
Murud Janjira – मुरुड जंजिरा आहे काय ? कुठे ?
भारतातील महाराष्ट्र राज्यात समुद्र किनारी असलेला रायगड किल्ला आहे. या रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. हे मुरुड नावाचे गाव अरबी समुद्रा जवळ आहे मात्र मुरुड च्याही पुढे राजपुरी आणि दंडा हि गावे समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर आहेत. ज्यांचे मुरुड पासूनचे अंतर केवळ ४ ते ५ किमी आहे.राजपुरी गावाच्या पश्चिमेला अरबी समुद्रात एक छोटेसे बेट आहे आणि याच बेटावर जंजिरा- Murud Janjira किल्ला चारही बाजूने असलेल्या अरबी समुद्रासोबत खेळत बागडत तोऱ्यात उभा आहे. त्यामुळे या किल्याला मुरुड जंजिरा असेही म्हणतात. किल्ल्यावर जाण्यासठी होडीशिवाय जाणे शक्य नाही. तर राजपुरी या गावाहून या होड्यांची सुविधा आपणास मिळते. ज्यांच्या माध्यमातून आपण मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाऊ शकतो.
Janjira Fort – जंजिरा किल्ला पूर्वकथा व इतिहास
Janjira Fort – जंजिरा किल्ला उभा राहण्याअगोदरचा थोडा इतिहास आता आपण पाहू. जसे कि अगोदरच आपण राजपुरी गावाबद्दल वाचले आहे या गावात आणि आसपासच्या भागात तसेच समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या निवांत बेटावर देखील कोळी वस्ती होती. मासेमारी मुख्य व्यवसाय असलेल्या कोळी समाजाच्या लोकांसाठी हे बेट म्हणजे एक वरदानच होते. परंतु या बेटावर राहणाऱ्या कोळ्यांना समुद्री लुटारूंपासून सतत धोका राहत असे. त्याकाळी हे बेट व इतर परिसर हा निजामशाही च्या अखत्यारीत येत असे. परंतु बेटावर निजामाचे प्रत्यक्ष नियंत्रण नव्हते तर या बेटावर राहणारे कोळीच याचे खरे मालक होते. या बेटावरील कोळ्यांचा एक प्रमुख नेता होता ज्याचे नाव होते “राम पाटील”. राम पाटीलांकडे मासेमारी करणाऱ्या लोकांचे नेहमी आर्जव असायचे कि आम्हाला समुद्री लुटारूंचा सतत त्रास होतो आहे. तसेच मासेविक्रीसाठी बेटावरून इतर गावी गेल्यास तेथील निजामाचे ठाणेदार त्यांना सतत त्रास देत असे. तर राम पाटीलांनी या बेटावर लाकडी ओडके वापरत एक तटबंदी तयार करून घेतली त्याला “मेढकोट” असे म्हणत. त्यानंतर निश्चिंत झालेले कोळी कुटुंबे या बेटावर स्थाईक होऊन निर्धास्त राहू लागले व ते निजामाच्या ठाणेदारासही जुमेनासे झाले. निजामापर्यंत या बाबी पोहोचल्यावर बहमनी सुलतानाच्या काळात जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२ ते १४८३ ला मेढकोट ला वेढा देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर क्लूनची इटिनेररी प्रवास वर्णनानुसार निजामाने राम पाटील व मेढकोटचा बंदोबस्त करण्यासाठी “पिरमखान” नावाचा चतुर सेनानी पाठवला. त्याने चतुराईने आपण दारूचे व्यापारी असून व्यापारासाठी आलो आहोत असा विश्वास रामपाटील यांना दिला. त्यानंतर रामपाटीलांना विश्वासात घेत आपल्या सैन्याने व हत्याराने भरून आणलेल्या जहाजाचे नांगर खाडीत टाकेल. परंतु राम पाटील आणि कोळ्यांकडून लढून मेढकोट घेणेशक्य नाही हे ओळखून त्याने राम पाटील यांना दारूचे आमिष दिले काही पिंप दारू त्याने राम पाटीलांना पाठवून दिली आणि या दारूने घात केला. नशेत असलेला कोळी समाज व राम पाटील यांचा विश्वासघात करत पिरमखान आपल्या सोबत आणलेल्या हत्यार व सैन्यासह मेढकोटात शिरला व बेटावरील नशेतील लोकांच्या निर्घुण कत्तली केल्या आणि मग अशारीतीने धोक्याने मेढकोट निजामाच्या अखत्यारीत आणला गेला. लक्षात घ्या इथपर्यंत आजचा अस्तित्वात असलेला जंजिरा-(Murud Janjira) किल्ला बनलेला नव्हता.
Murud Janjira Fort- मुरुड जंजिरा किल्ला निर्माण आणि सिद्दी
पेरिमखान नावाच्या सिद्दीने कोळ्यांना फसवून “मेढकोट” निजामशाहीत सामील केला, पेरीमखान एक सिद्धी/ हबशी होता . सिद्दी किंवा हबशी म्हणजे कोण ? तर ॲबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून लोक पंधराव्या शतकाच्या दरम्यान पश्चिम भारतात येऊ लागले. अरब-अल्-हबीश (हबश) येथून येणारे हे लोक हबशी म्हणून ओळखले जातात. त्यांना सौदी असेही म्हणत. तसेच सय्यद वा सय्यदी (हजरत महंमदांचा वंशज) या नावाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हा शब्द रुढ झाला असावा. पोर्तुगीजांनी हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून हिंदुस्थानात आणले तरी त्यांची निष्ठा, धैर्य व कार्यक्षमता यांमुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा मिळत गेला व अल्पावधीतच हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्ध झाले होते. असा हा सिद्दी पेरिमखान बारा वर्षे “मेढकोट”वर होता आणि १५३८ मध्ये सिद्दी पेरिमखान मरण पावला. पेरिमखानानंतर आलेल्या बुऱ्हान या आरमार प्रमुखाने १५६७— ७१ दरम्यान हा बुलंद किल्ला बांधला असा उल्लेख मिळतो आणि त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले होते. बुऱ्हाणखानाची नेमणूक येथे झाली होती व त्याने या बेटावर “मेढकोट” च्या जागी भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली असा ऐतिहासिक उल्लेख देखील सापडतो. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानानेच बांधलेले आहे. त्यांनतर इस १६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा सिद्दी अंबर हा मूळ पुरुष समजला जातो. या किल्ल्यातील प्रत्येक पिढीतील सिद्दींनी हा किल्ला प्राणपणाने लढून नेहमी अजिंक्य राखण्यात यश मिळविले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र वीर संभाजी महाराजांनी देखील मुरुड किल्ला हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केला होता व त्यानंतर मुरुड किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नव्हते.
Murud Janjira येथे चोहो बाजूने अरबी समुद्राचे खारे पाणी तर मध्यभागी गडावर गोड पाणी
जंजिरा किल्ला निर्मिती होत असतना लागणारे दगड हे याच बेटावर खोदून मिळविले गेले होते. खोदकाम करून मिळणाऱ्या दगडांचा वापर करून हळूहळू किल्ल्याची निर्मिती केली गेली परंतु हे खोदकाम करतांना या गडावर गोड पाण्याच्या झऱ्याचा शोध लागला हे एक नवलच म्हणावे लागेल कि या बेटाच्या चोहो बाजूने खाऱ्या पाण्याचा अथांग समुद्र असून सुद्धा गडावर गोड पाण्याचे दोन मोठ मोठे तलाव आहेत.
Janjira Fort जंजिरा किल्ल्या बद्दल
Murud Janjira- मुरुड जंजिरा किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत व बुलंद आहे शेकडो वर्षांपूर्वीचे बांधकाम आजही साबूत आहे. तटबंदीची उंची अंदाजे १३ ते १५ मीटर असायला पाहिजे. समुद्रांच्या लाटांनी तटबंदीच्या दगडांना थोडेसे झिजवले जरूर आहे पण बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुना आजही अरबी समुद्राला चिडवत उभा आहे. किल्याला समुद्राकडून दरवाजा आहे. जंजिरा किल्याला १९ अत्यंत मजबूत बुरुज आहेत या बुरुजांवरूनच त्याकाळातील गडावरील सैनिक गडाची निगराणी करत असे व समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणाचा सामना करत असे. प्रेत्येक दोन बुरुजांमध्ये ९० फुटाचे अंतर आहे. तसेच पायऱ्यांचा वापर तटबंदीपर्यंत जाण्यासाठी केलेला दिसून येतो. तटबंदीमध्ये कमानी तयार करण्यात आल्या आहेत. या कमानीत तोफा ठेवण्यात येत असे. मुरुड जंजिरा किल्ल्यावर ५९२ तोफा अस्तित्वात होत्या असा ऐतिहासिक उल्लेख आहे परंतु सध्या यापैकी प्रमुख तीन तोफा जसेकी “कलाल बांगडी”, “चावरी” आणि “लांडाकासम” या आजही येथे पाहावयास मिळतात. तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी पूर्वी खंदक बनविलेले होते . बालेकिल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला गडावर जत्रा भरते. रामपंचायतन हे पुर्विपासूनचे गडावरील कोळ्यांचे श्रद्धेचे स्थान आहे याला राम पाटील यांचा देखील ऐतिहासिक संदर्भ असू शकतो कारण राम पाटील हे मेढकोट या मूळ किल्ल्याचे सरदार होते. तसेच गडावर सिद्दी सरदारांच्या काही कबरी देखील आहेत. गडावर चार मशिदी, दोन तलाव, दोन ते तीन मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आजही आढळतात. याशिवाय तेथील विदेशी व देशी तोफा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण होय. विदेशी तोफांमध्ये स्वीडनच्या ३ आणि नेदर्लंड्स (हॉलंड), स्पेन व फ्रान्स यांची प्रत्येकी एक तोफ आहे. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७ च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिमखानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे. जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहोचल्यानंत, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे आणि प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. “आपल्या चारही पायात चार हत्ती पकडलेल्या अवस्थेत एका वाघ दिसतो आणि एवढेच काय तर त्या वाघाच्या शेपटीत आणखी एक हत्ती गुंडाळला आहे”, असे ते चित्र आहे. बुऱ्हाणखान जसेकी तत्कालीन इतर सत्ताधीशांना धमकावत आहे की, “या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका कारण तुम्ही जरी हत्ती असाल, पण मी शेर आहे.”
Murud Janjira या अजिंक्य किल्ल्याचे भारतात विलीनीकरण
असा हा अजेय जंजिरा Murud Janjira २० सिद्दी सत्ताधीशांनंतर त्यांचा वंशज असलेला सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी अस्तित्वात असताना आणि त्यांच्या जंजिरा “जंजिरा” राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी तेही भारतीय स्वातंत्र्यानंतर म्हणजेच ३ एप्रिल १९४८ रोजी हे राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले व ते तत्कालीन मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर काही काळ लोकवस्ती या गडावर कायम होती पण नंतर येथून लोकांचे पलायन होऊन आजूबाजूच्या गावांत लोक स्थाईक झाले व त्यांचे येथील घरे व इमारती आजही गडावर आपणास पहावयास मिळतात.
Murud-Janjira Photos
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या महान गड किल्ल्यास एकतरी भेट प्रत्येक भारतीयाने द्यावी व आपला भूतकाळ व इतिहास कसा आजही खंबीरपणे उभा आहे ते याची देही अवश्य पहावा.
FAQ
Q. Who is the founder of Janjira? जंजिरा चा संस्थापक कोण ?
Ans. बुऱ्हानखान या सिद्दी आरमार प्रमुखाने १५६७— ७१ दरम्यान जंजिरा हा बुलंद किल्ला बांधला असा ऐतिहासिक उल्लेख मिळतो.
Q. Who killed Siddi of Janjira? जंजिरा किल्ल्याच्या सिद्दीला कोणी मारले ?
Ans. कोणीही नाही, उलट मेढकोट जिंकण्यासाठी पिरमखान या सिद्दी सरदाराने राम पाटील व इतर कोळ्यांना दारूची नशा देऊन धोक्याने मारले बेट ताब्यात घेतले व नंतर त्याठिकाणी जंजिरा किल्ला बनविला गेला. त्यांनतर जंजिरा ३३० वर्षे अजिंक्य राहिला होता.
Q.Which state is Janjira in? जंजिरा कोणत्या राज्यात आहे ?
Ans. भारतातील महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारे लाभलेला जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात राजपूरी गावाच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रात एका बेटावर जंजिरा किल्ला स्थित आहे.
Q.Was Janjira captured by Marathas? मराठ्यांनी जंजिरा हस्तगत केला होता का?
Ans. नाही, किल्याचे खाऱ्या पाण्याच्या समुद्रातील मध्यभागी असलेले स्थान व इतर अडचणीत ही हा गड घेण्यासाठी मराठे जिकिरीने लढले परंतु त्यांना जंजिरा हस्तगत करता आला नाही, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अन्य पेशवे व इतर मराठे जीकरीने लढले पण त्यांना जंजिरा किल्ला जिंकता आला नाही
Q.Is Janjira won by Sambhaji Maharaj? संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकला होता का?
Ans. नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु त्यांना जंजिरा जिंकता आला नाही त्यानंतर त्यांनी .स्वराज्यासाठी जंजिरा किल्यापासून जवळच एक नवीन किल्ला पंध्ला ज्याला “पद्मदुर्ग” असे म्हणतात.
https://www.youtube.com/watch?v=oFo_bQRutX4
आमच्या इतर ब्लॉग साठी येथे क्लिक करा.
आमच्या प्रवास या विषयीच्या ब्लॉगसाठी येथे क्लिक करा.
