Narendra Modi आणि Giorgia Meloni यांच्या (Rome) रोममधील महत्त्वपूर्ण बैठकीत भारत-इटली संबंधांना ऐतिहासिक उंची मिळाली आहे. दोन्ही देशांनी परस्पर संबंधांना “स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप” या सर्वोच्च स्तरावर नेण्याचा मोठा निर्णय घेतला. इटलीची राजधानी Rome येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, शिक्षण, ब्ल्यू इकॉनॉमी आणि लोकांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक सहकार्याची घोषणा केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष स्वागत करताना म्हटले की, “आज (Rome) रोममध्ये आपण आपल्या संबंधांना आणखी बळकट करत आहोत आणि ते आता ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’पर्यंत पोहोचले आहेत. दोन देशांमधील संबंधांमध्ये ही सर्वोच्च पातळी आहे. आता भारत आणि इटली यापूर्वी कधी नव्हते इतके जवळ आले आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, मागील साडेतीन वर्षांत पंतप्रधान मोदींसोबत सात वेळा भेट झाली असून त्यातून परस्पर आदर, विश्वास आणि प्रामाणिक मैत्री निर्माण झाली आहे. मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. “मी पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी, व्यवहारज्ञान आणि नेतृत्व शैली जवळून अनुभवली आहे. अनेक वर्षे सत्तेत राहूनही नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता टिकून आहे. आमची मैत्री दोन्ही देशांना जलदगतीने एकत्र काम करण्यासाठी मदत करत आहे,” असे त्या म्हणाल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली सरकारकडून झालेल्या भव्य स्वागताबद्दल आभार मानले. त्यांनी रोम आणि काशी या दोन प्राचीन संस्कृतींचा उल्लेख करत भावनिक भाष्य केले. “रोमला जगात ‘एटर्नल सिटी’ म्हणून ओळखले जाते. माझा लोकसभा मतदारसंघ काशीही अशाच प्रकारे ओळखला जातो. जेव्हा दोन महान संस्कृती एकत्र येतात, तेव्हा चर्चा केवळ अजेंड्यापुरती मर्यादित राहत नाही; त्यात इतिहासाची खोली, भविष्याची झलक आणि मैत्रीची सहजता दिसते,” असे मोदी म्हणाले.

(Rome) रोममधील महत्त्वपूर्ण बैठकी विषयी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते Randhir Jaiswal यांनी दिलेली माहिती
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते Randhir Jaiswal यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांची बैठक(Rome) रोममधील प्रसिद्ध Villa Doria Pamphili येथे झाली. मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळांमध्ये सविस्तर चर्चा पार पडली. या बैठकीत “जॉइंट स्ट्रॅटेजिक अॅक्शन प्लॅन 2025-29” च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांनी व्यापार, गुंतवणूक, प्रगत तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य, समुद्री अर्थव्यवस्था, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि लोकसंपर्क या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक व्यापक करण्यावर सहमती दर्शवली. तसेच जागतिक भूराजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली आणि समान हिताच्या जागतिक मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याचे ठरले.
या दौऱ्यात भारत आणि इटलीदरम्यान अनेक महत्त्वाचे करार आणि सामंजस्य करारांची देवाणघेवाणही झाली. यात महत्त्वपूर्ण खनिजे (Critical Minerals), संरक्षण औद्योगिक सहकार्य, सुरक्षा, सागरी वाहतूक व बंदरे, कृषी संशोधन, उच्च शिक्षण, नर्स भरती आणि आयुर्वेद या क्षेत्रांचा समावेश आहे. या करारांमुळे दोन्ही देशांतील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, भारत आणि इटली यांच्यातील वाढते सहकार्य हे युरोप आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बदलत्या जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे. संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देश परस्पर भागीदारी वाढवण्यास उत्सुक असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
भारत-इटली संबंधांना “स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप”चा दर्जा मिळाल्याने आगामी काळात द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि जागतिक मंचांवरील सहकार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉग[पोस्ट :
