गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कठोर भूमिका मांडली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शाह यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) कामकाजाचा उल्लेख करत घुसखोरांविरोधात केंद्र सरकार निर्णायक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. अमित शाह म्हणाले की, “निवडणुकांच्या काळात आम्ही आश्वासन दिले होते की सत्तेत आल्यानंतर बांगलादेश सीमेजवळ कुंपण बांधण्याचे काम वेगाने सुरू करू. आता पश्चिम बंगालमधील 600 हेक्टर जमीन अवघ्या सात दिवसांत बीएसएफकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यासाठी मी सुवेंदू अधिकारी यांचे अभिनंदन करतो.” ‘चिकन नेक’ भागातील जमीनही केंद्राच्या ताब्यात – शाह यांनी आपल्या भाषणात रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ‘चिकन नेक’ भागाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, चिकन नेक’ भागातील “121 हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे सीमाभागातील सुरक्षा अधिक मजबूत होणार असून कुंपण उभारणी आणि देखरेख सुलभ होईल.” ‘चिकन नेक’ म्हणून ओळखला जाणारा सिलीगुडी कॉरिडॉर हा भारताच्या ईशान्य राज्यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा अत्यंत संवेदनशील पट्टा मानला जातो. या भागात सुरक्षा आणि घुसखोरीचे प्रश्न नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

‘घुसखोर स्वतःहून परत जात आहेत’ – Amit Shah
गृहमंत्र्यांनी दावा केला की केंद्र सरकारच्या कठोर धोरणांमुळे आता बेकायदेशीर घुसखोर स्वतःहून परत जाऊ लागले आहेत. “पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने डिटेन्शन सेंटर्स उभारले आहेत. मात्र आमची इच्छा आहे की घुसखोरांनी स्वतःहून आपल्या देशात परत जावे,” असे शाह यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात बंगालमधील नागरिकत्व, सीमा सुरक्षा आणि घुसखोरीचा मुद्दा पुन्हा राजकीय केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून हकालपट्टी करणार’ – Amit Shah
(Amit Shah) अमित शाह यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारची भूमिका अधिक स्पष्ट करत सांगितले की, “देशातील प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर पाठवण्याचा संकल्प आमच्या सरकारने केला आहे.” या वक्तव्यामुळे विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून मानवाधिकार, नागरिकत्व आणि सीमावर्ती राज्यांमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
विरोधकांकडून टीकेची शक्यता
(Amit Shah) शाह यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाचा आरोप केला जाऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात घुसखोरी, NRC आणि सीमा सुरक्षेच्या मुद्द्यांवर सातत्याने संघर्ष होत आला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, लोकसभा निवडणुकीनंतरही हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचा राहणार असून सीमावर्ती राज्यांमध्ये त्याचा थेट परिणाम दिसू शकतो.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
