आज, १ ऑगस्ट रोजी, महाराष्ट्राचे क्रांतिकारी लोककवी, समाजसुधारक आणि दलित साहित्याचे जनक अण्णा भाऊ साठे यांची जयंती (Annabhau Sathe Jayanti ) राज्यभर साजरी केली जात आहे. आपल्या लेखणीने आणि लोककलेच्या माध्यमातून परंपरेने शोषित, वंचित, कामगार आणि दलित समाजाचा आवाज बनलेल्या अण्णा भाऊंनी मराठी साहित्याला नवे सामाजिक भान दिले. फकीरा या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीसह, पोवाडे, लावण्या, कथासंग्रह आणि लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायाविरोधात संघर्षाचा झंझावात निर्माण केला. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदा देखील संपूर्ण राज्यभर विविध ठिकाणी अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आजच्या लेखात आपण अण्णाभाऊ साठे म्हणजे नेमके कोण ? आणि त्यांचे कार्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात….

Annabhau Sathe Jayanti – अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९), ज्यांना लोक अण्णा भाऊ साठे या नावाने ओळखतात , हे महाराष्ट्रातील एक प्रतिभावान लोककवी, साहित्यिक आणि सामाजिक क्रांतिकारक होते. अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातंग समाजात जन्म झालेल्या अण्णाभाऊ साठे यांचे बालपण आणि सामाजिक पार्श्वभूमी हे त्यांच्या लेखणीच्या आणि लढ्याच्या केंद्रस्थानी होते.
अण्णा भाऊ साठे हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारसरणीचे अनोखे मिश्रण होते. प्रारंभी कम्युनिस्ट चळवळीने प्रभावित झाल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे वळण घेतले. त्यांना दलित साहित्याचे जनक म्हणून गौरवले जाते. ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे सुद्धा महत्त्वाचे शिल्पकार होते.
Annabhau Sathe Jayanti
Annabhau Sathe यांचे सुरुवातीचे जीवन
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावात झाला. मातंग समाजात जन्मलेले साठे यांचे कुटुंब पारंपरिक तमाशा कलांमध्ये सहभागी होते. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी नाममात्र शिक्षण घेतले. १९३१ मध्ये दुष्काळामुळे त्यांनी सातार्याहून मुंबईकडे तब्बल सहा महिने चालत प्रवास केला आणि शहरात पोहचून अनेक छोटे-मोठे कामे करत उपजीविका केली.
Annabhau Sathe यांचे साहित्यिक योगदान
अण्णा भाऊंनी एकूण ३५ मराठी कादंबऱ्या लिहिल्या, ज्यातील फकीरा (१९५९) ही विशेष उल्लेखनीय आहे. या कादंबरीला १९६१ मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आणि तिच्या १९ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. फकीरा या कादंबरीत ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उठाव करणाऱ्या आणि आपल्या समाजासाठी लढणाऱ्या तरुणाची कथा आहे. जोगिन या धार्मिक रूढीमधून कथानकाची सुरुवात होते, आणि तेथून फकीराचा विद्रोह सुरू होतो.
अण्णाभाऊ साठे यांनी १५ कथासंग्रह लिहिले असून त्यांच्या कथा २७ परदेशी भाषांमध्ये आणि अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आल्या आहेत. त्यांनी नाटके, प्रवासवर्णन (माझा रशियाचा प्रवास), १२ चित्रपट कथालेखनं, आणि १० पोवाडे देखील लिहिले आहेत. पोवाडा आणि लावणी सारख्या लोकधर्मी शैलींचा त्यांनी प्रभावी वापर केला, ज्यामुळे त्यांच्या लेखनाची लोकांपर्यंत सहज पोहोच झाली.
त्यांचे लेखन केवळ ग्रामीणच नव्हे तर नागरी वास्तवाचे देखील अस्सल प्रतिबिंब होते. मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या गाण्यांमध्ये त्यांनी शहराच्या भयंकर विषमता, अन्याय, आणि शोषणाचे ज्वलंत चित्रण केले आहे.
अण्णाभाऊ साठे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा
होय, अण्णा भाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही प्रभावी पोवाडे लिहिले होते. त्यांनी आपल्या जोशपूर्ण लेखनशैलीतून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, शौर्याचा आणि स्वराज्य स्थापनेचा जयघोष आपल्या पोवाड्यांमधून केला आहे. त्यांनी शिवरायांवर लिहिलेले हे पोवाडे विदेशात जाऊन म्हणजे रशियात तत्कालीन सोवियत युनियन मध्ये जाऊन आपल्या पहाडी आवाजात गायिले आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत – छत्रपती शिवरायांचा जगातील उत्कृष्ट राजा म्हणून विदेशात प्रचार केला.
या बाबतचा एक प्रसिद्ध घटनाक्रम असा कि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू रशियाच्या (तत्कालीन सोवियत युनियन) दौऱ्यावर असताना तेथे लोक रस्त्यावर दुतर्फा उभे राहून “शिवाजी महाराज कि जय” असे नारे लाऊ लागले तेव्हा या गोष्टीचे नेहरूंना आश्चर्य वाटले कि रशियातील लोकांना भारताचे ग्रेट शिवाजी महाराज यांच्याविषयी कशी काय माहिती आहे आणि ते “शिवाजी महाराज कि जय” चे नारे कसे काय देत आहेत. म्हणून नेहरूंनी लागलीच चौकशी केली असता तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि “अण्णाभाऊ साठे” यांच्या रशियाच्या दौऱ्यादरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीरतेची माहिती अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून रशियामध्ये पोहोचवली होती. व अश्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात तत्कालीन सोवियत युनियनचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांवरील” पोवाडा ऐकल्यावर प्रभावित होऊन त्यांनी “अण्णाभाऊ साठे” यांची गळा भेट घेतली होती . विशेष म्हणजे या वेळेपर्यंत नेहरूंना देखील “अण्णाभाऊ साठे” कोण आहेत हे माहित नव्हते. मग नंतर नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून “अण्णाभाऊ साठे” यांच्याबद्दल माहिती काढून त्यांची भेट घेतली होती.
पृथ्वी हि सापाच्या फण्यावर नाही तर दलित आणि श्रमिकांच्या कष्टावर उभी आहे.”
अण्णाभाऊ साठे
अण्णा भाऊ साठे यांचा स्टॅलिनवरील पोवाडा
अण्णा भाऊ साठे हे केवळ भारतीय सामाजिक परिवर्तनाचे लेखक नव्हते, तर जागतिक क्रांतीकारक विचारांनाही त्यांनी आपल्या लेखणीने स्थान दिले. त्यांनी रशियन नेते जोसेफ स्टॅलिन यांच्यावर पोवाडा लिहिला, जो मराठी साहित्यात एक दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग मानला जातो. या पोवाड्यातून त्यांनी स्टॅलिन यांची हुकूमशाही नव्हे, तर शोषितांच्या हितासाठी केलेली क्रांती म्हणून महती गायली. अण्णा भाऊंनी स्टॅलिनला “श्रमिकांचा कैवारी”, “शोषणाविरुद्ध उभा राहिलेला योद्धा” असे गौरवले.
या पोवाड्यातून त्यांनी सांगितले की, रशियात घडणाऱ्या क्रांतीचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला पाहिजे. त्यांनी स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली श्रमिकांनी उभारलेल्या सोवियत संघाची गौरवगाथा भारतीय लोककलेतून सांगितली. त्यांच्या या पोवाड्यामुळे दलित आणि मजूर वर्गाला आंतरराष्ट्रीय क्रांतीशी आपली नाळ जोडल्यासारखी वाटली. त्यामुळे अण्णा भाऊंचा स्टॅलिनवरील पोवाडा हा केवळ व्यक्तिपूजा नव्हता, तर क्रांतीचा जागर होता – जो आजही प्रेरणादायी ठरतो
Annabhau Sathe याची राजकीय विचारसरणी
अण्णाभाऊ साठे सुरुवातीला साम्यवादी विचारांनी प्रभावित होते. त्यांनी लाल बावटा कला पथक या कम्युनिस्ट पक्षाच्या सांस्कृतिक पथकात काम केले. तमाशाच्या माध्यमातून हे पथक तत्कालीन सरकारविरोधी जनजागृती करीत असे. अण्णाभाऊ साठे हे भारतीय जननाट्य संघ (IPTA) चेही महत्त्वाचे सदस्य होते.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित दलित चळवळीला चालना दिली. १९५८ साली त्यांनी पहिले दलित साहित्य संमेलन मुंबईत आयोजित केले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी म्हटले की, “पृथ्वी हि सापाच्या फण्यावर नाही तर दलित आणि श्रमिकांच्या बळावर उभी आहे.” ही घोषणा दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व अधोरेखित करणारी होती.
ते म्हणायचे, “दलित साहित्यिकांवर जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या समाजाला व्यवस्थेतील शोषणातून मुक्त करावे. ही दीर्घकाळ चालत आलेली अन्यायकारी व्यवस्था एका क्षणात मोडता येणार नाही, परंतु लेखणीतून तिचा प्रतिकार करता येतो.”
“माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतीया कायली”
अण्णाभाऊ साठे
अण्णा भाऊ साठे — संयुक्त महाराष्ट्र जनक, शिल्पकार
अण्णा भाऊ साठे हे केवळ दलितांचे साहित्यिक नव्हते, तर ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक प्रभावी नेतृत्व होते. त्यांच्या लेखणीने, लोककलेने आणि ज्वलंत भाषणांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला लोकांमध्ये ऊर्जा आणि दिशा दिली. कर्नाटक राज्यात राहून गेलेला बेळगाव, कारवार सारख्या मराठी मुलुखासाठी हृदयाच्या खोलीतून लिहिलेले आणि बेंबीच्या देठापासून गायलेले “माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतीया कायली” या गीताने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी मनाला गवसणी घातली होती. संवादाची मोजकी साधने असलेल्या या काळात अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या आणि लोककलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र एकसंध केला. ते या चळवळीचे शिल्पकार आणि प्रणेते होते, ज्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यांच्या पोवाड्यांतून आणि लावण्यांतून त्यांनी महाराष्ट्राच्या एकतेचा आणि स्वाभिमानाचा जागर केला. अण्णा भाऊंनी सांगितले की, “महाराष्ट्र केवळ भूगोल नाही, तो जनतेचा आत्मा आहे”. त्यांच्या कलमातून आणि कंठातून निर्माण झालेली ही चळवळ केवळ भाषिक एकता नव्हे, तर सामाजिक न्यायाचीही चळवळ होती. त्यामुळेच अण्णा भाऊ साठे यांना संयुक्त महाराष्ट्राचे जनक व शिल्पकार म्हणणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक गौरवपूर्ण सत्य आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर, विशेषतः त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर, विशेषतः त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटांची यादी खाली दिली आहे. अण्णाभाऊ साठे यांनी दलित, शोषित, कामगार वर्गाच्या जीवनाचे वास्तव व लढा शब्दबद्ध केला होता. त्यांच्या प्रभावशाली कथांवर काही महत्त्वाचे चित्रपट निर्माण झाले आहेत:
अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट
- रिक्शावाला (Rickshawala)
- भाषा: मराठी
- वर्ष: 1971
- कादंबरीवर आधारित:रिक्शावाला– अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी
- कथानक:एका गरिब रिक्षाचालकाचे जगणे, शहरातील जीवनाशी चाललेली झुंज, शोषण आणि स्वाभिमान यातील संघर्ष
- विशेष:समाजातील उपेक्षित घटकांचे वास्तव चित्रण
- फकीरा (Fakira)
- भाषा:हिंदी
- वर्ष:1976
- निर्माता/दिग्दर्शक: सुनील दत्त यांच्या सहभागासह व्यावसायिक निर्मिती
- कादंबरीवर आधारित:फकीरा – अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी
- कथानक: एका धिटगाज व्यक्तिमत्वाचा अन्यायाविरुद्ध लढा, समाजहितासाठीचा बलिदान
- विशेष: मूळ मराठी कथानकावर आधारित असला तरी सिनेमात काही व्यावसायिक बदल झाले
या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यावर आधारित बरेच चित्रपट तयार झाले जसे कि –
| कादंबरी | चित्रपट |
| वैजयंता | वैजयंता , रेखा फिल्म्स, 1961 |
| आवडी | टिळा लावते मी रक्ताचा, चित्रज्योती कंपनी, 1969 |
| माकडीचा माळ | डोंगराची मैना, विलास चित्र कंपनी, 1969 |
| चिखलातील कमळ | मुरली मल्हारी रायाची, रसिक चित्र कंपनी, 1969 |
| वारणेचा वाघ | वारणेचा वाघ, नवदीप चित्र कंपनी, 1970 |
| अलगुज | अशी हि साताऱ्याची तऱ्हा, श्रीपाद चित्र कंपनी, 1974 |
| फकीरा | फकीरा (चित्रनिकेतन कंपनी) |
| चित्रा | चित्रा, 2012 |
अण्णा भाऊ साठे यांचा वारसा
नाममात्र शिक्षण घेऊन साहित्य क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे अण्णाभाऊ साठे हे एकमेव आणि अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत. केवळ अक्षर ओळखी पुरते शिक्षण घेतलेल्या या लढवय्या साहित्यिकाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर दलित, शोषित आणि कामगार वर्गाचे जीवन शब्दबद्ध केले. त्यांच्या लेखनाची प्रभावी ताकद इतकी होती की, त्यांच्या साहित्यकृतींचे भाषांतर जगभरातील विविध तब्बल २७ भाषांमध्ये झाले. ही बाब मराठी साहित्याच्या इतिहासात अभिमानाची असून, एका अशिक्षित वा अल्पशिक्षित व्यक्तीने केवळ अनुभव, निरीक्षण आणि समर्पणाच्या जोरावर जागतिक वाचकांपर्यंत पोहोचणे ही अतुलनीय गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठेंचे लेखन हे केवळ कथा नसून सामाजिक परिवर्तनाची हाक आहे
- आज अण्णा भाऊ साठे हे दलित समाजाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र शासनाद्वारे १९८५ साली त्यांच्या नावाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. संपूर्ण भारतात विषेत: महाराष्ट्रात विविध संघटना, शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज व अन्य संस्थेद्वारे अण्णा भाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
- १ ऑगस्ट २००२ रोजी भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ ₹४ चे टपाल तिकीट अण्णा भाऊ साठेयांच्या नावावर जारी केले. पुण्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि मुंबईतील कुर्ला भागात त्यांच्याच नावाने उभारलेला उड्डाण पूल त्यांच्या स्मृती जपत उभे आहेत.
- रशियात देखील विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभे आहेत नुकताच २०२२ साली रशियाच्या मार्गारिटा रुडोमिनो ऑल-रशिया स्टेट लायब्ररी फॉर इंटरनॅशनल लिटरेचर मध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला — हे त्यांच्या जागतिक प्रतिष्ठेचे द्योतक आहे. अशा या सर्वसामन्यातील असामान्य महापुरुषास आणि साहित्य सागरास त्यांच्या जन्म जयंती निमित्त कोटी कोटी नमन !!!
अण्णाभाऊ साठे यांच्या गीतावर आधारित युट्यूब वरील व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आधारित माहिती देणारा युट्यूब वरील व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
महात्मा फुले जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा – Mahatma Fule
क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अद्वितीय योद्धा (Lahuji Salve)
(Dr Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा !
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शिवमय मंगल शुभेच्छा ! – Shivaji Maharaj
Mahavir Jayanti- भगवान महावीर जयंती !
गुरु गोबिंद सिंह: एक प्रेरणादायी जीवन प्रवास- Gurugovindsingh
