पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील (Port) बंदर व्यवस्था, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि (Fuel) इंधन उपलब्धता याबाबत केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनी घेतलेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीत देशातील लॉजिस्टिक्स आणि ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय बंदर (Port), जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयातील संयुक्त सचिव मुकेश मंगल यांनी माहिती देताना सांगितले की, देशातील कोणत्याही प्रमुख बंदरावर आवश्यक वस्तूंची कमतरता नाही आणि सर्व बंदरांवरील कामकाज सुरळीत सुरू आहे. पूर्वी जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) आणि कांडला बंदर येथे कंटेनरची गर्दी वाढल्याचे दिसून आले होते. मात्र, ही समस्या बंदर व्यवस्थेतील त्रुटींमुळे नसून मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या जहाज सेवांमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे निर्माण झाली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या घडीला परिस्थितीत मोठी सुधारणा झाली असून देशभरातील बंदरांवरील कंटेनर बॅकलॉग 90 टक्क्यांहून अधिक कमी झाला आहे. मंत्रालयाने तेल कंपन्या आणि इतर संबंधित संस्थांशी समन्वय साधून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले असून अडचणी त्वरित दूर केल्या जात आहेत.

ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलल्याची माहिती दिली आहे. अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांनी सांगितले की, संकटाच्या काळात वीज उत्पादन खंडित होऊ नये म्हणून केंद्राने ‘सेक्शन 11’ अंतर्गत निर्देश जारी करून आयातीत कोळशावर चालणाऱ्या सर्व वीज प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे सुमारे 4000 मेगावॅट अतिरिक्त वीज उपलब्ध झाली असून, यात Tata Power CGPL Mundra या प्रकल्पाचाही समावेश आहे. तसेच नियोजित देखभाल कामे पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली असून, त्यामुळे आणखी सुमारे 10,000 मेगावॅट वीज उपलब्धता सुनिश्चित झाली आहे. याशिवाय, विविध विभागांमधील समन्वयामुळे देशातील कोळशाचा साठा सुमारे 55 दशलक्ष टनांपर्यंत कायम ठेवण्यात यश आले असून, हा साठा जवळपास 19 दिवसांच्या गरजा भागविण्यास सक्षम आहे. आगामी तीन महिन्यांत थर्मल, सौर, पवन आणि जलविद्युत प्रकल्पांद्वारे सुमारे 22,000 मेगावॅट नवीन वीज क्षमता जोडण्याचे नियोजन आहे. गॅस-आधारित वीज प्रकल्पांची क्षमता केवळ 1.4 टक्के असली तरी त्यांनाही LNG आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे एकूण वीजपुरवठा स्थिर राहण्यास मदत होत आहे. सरकारच्या या एकत्रित आणि नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे देशातील वीजपुरवठा सध्या सुरक्षित आणि संतुलित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Port वर भारतीय खलाशांची सुरक्षितता सुनिश्चित
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्या भागात कार्यरत असलेल्या भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबतही सरकारने माहिती दिली. आतापर्यंत कोणतीही अप्रिय घटना घडलेली नसून सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. DG Shipping च्या नियंत्रण कक्षाकडून 24×7 मदत पुरवली जात असून आतापर्यंत 1,900 हून अधिक खलाशांची सुरक्षित परतफेड करण्यात आली आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि इतर समुद्री क्षेत्रातील भागधारकांशी सातत्याने समन्वय ठेवला जात आहे.
इंधन (Fuel) व LPG पुरवठा मुबलक; कोणतीही कमतरता नाही
दरम्यान, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयातील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी देशातील इंधन साठ्याबाबत आश्वासक माहिती दिली आहे. त्यांच्या मते, देशातील सर्व LPG वितरक आणि पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कुठेही ‘ड्राय-आउट’ (तुटवडा) झालेला नाही. घरगुती LPG सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून सुमारे 98 टक्के बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत आहे. याशिवाय, सुमारे 92 टक्के वितरण OTP पडताळणीद्वारे पार पडत आहे, ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे.
व्यावसायिक LPG पुरवठा टप्प्याटप्प्याने सुधारतोय
व्यावसायिक LPG पुरवठा सध्या 70 टक्क्यांपर्यंत पूर्वस्थितीत आला आहे. यामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, ढाबे, औद्योगिक युनिट्स, औषधनिर्मिती क्षेत्र आणि स्थलांतरित कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. सरकारकडे कच्च्या तेलाचे (crude oil) पुरेसे साठे उपलब्ध असल्याने भविष्यातही इंधन पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
एकूण परिस्थिती स्थिर, घाबरण्याचे कारण नाही
पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि मानव संसाधन व्यवस्थापनात प्रभावी समन्वय दाखवला आहे. बंदरे सुरळीत, पुरवठा साखळी मजबूत आणि इंधन उपलब्धता स्थिर असल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारकडून सतत परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले जात असून, गरज भासल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
