द्रौपदी मुर्मू यांनी आज समाजसुधारक (Mahatma Phule Jayanti) महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरातील प्रेरणा स्थळ येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी फुले यांच्या कार्याचा गौरव करताना, समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचे स्मरण केले. महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.याच प्रसंगी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही महात्मा फुले यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजातही महत्त्व अधोरेखित केले. संसद भवन परिसरात आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना, “समता, न्याय आणि शिक्षण या मूल्यांसाठी आयुष्य समर्पित करणारे ते दूरदृष्टीचे समाजसुधारक होते,” असे म्हटले. महिलांचे आणि वंचित घटकांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य देशासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षाची सुरुवात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.दिल्लीतील संसद परिसरात पंतप्रधान मोदी यांनी (Mahatma Phule )महात्मा फुले यांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच इतर नेतेही उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, दुष्यंत कुमार गौतम आणि तरुण चुघ यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

Mahatma Phule Jayanti निमित्त जाणून घेऊ त्यांच्याबद्दल थोडेसे..
महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Phule) हे भारतातील अग्रगण्य समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी नेते होते, ज्यांनी 19 व्या शतकात समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीय विषमता याविरुद्ध ठामपणे आवाज उठवला. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. त्या काळात समाजात स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती आणि शूद्र-अतिशूद्र वर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, जे त्या काळात अत्यंत क्रांतिकारक पाऊल होते. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले, बालविवाहाचा विरोध केला आणि सतीप्रथेसारख्या अमानवी प्रथांवर कठोर टीका केली.
1873 मध्ये त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ची स्थापना करून समाजातील खोट्या परंपरा आणि ब्राह्मणवादी वर्चस्वाला आव्हान दिले. त्यांच्या ‘गुलामगिरी’ सारख्या ग्रंथातून त्यांनी सामाजिक विषमता आणि अन्यायावर प्रकाश टाकला. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, पाणीटंचाई, आणि आर्थिक शोषण यावरही भाष्य केले, त्यामुळे ते केवळ सामाजिक नव्हे तर आर्थिक विचारवंतही होते. त्यांच्या कार्यामुळे समाजात समानता, बंधुता आणि मानवतेची भावना दृढ झाली. आजही त्यांचे विचार आधुनिक भारतासाठी मार्गदर्शक ठरतात आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यात प्रेरणा देतात.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
